उद्घाटनानंतर दोनच दिवसांत बंद पडली मेट्रो

96

एखाद्या प्रकल्पाचे मोठ्या दिमाखात उदघाटन करायचे, मात्र त्यानंतर काही तांत्रिक अडचणी आल्यावर तो प्रकल्प बंद पडतो, हा असा विचित्र प्रकार महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला मेट्रो २ ए मार्गाचे लोकार्पण झाले, परंतु २ दिवसांनंतर अर्थात सोमवार, ४ एप्रिल २०२२ रोजी या मार्गावर मेट्रो बंद पडली. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे.

३० मिनिटे मेट्रोचे दरवाजे बंद होते

गुढीपाडव्याच्या दिवशी या मेट्रोचे लोकार्पण झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी या प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर दोनच दिवसांत मागाठाणे स्थानकात ही मेट्रो बंद पडली. काही तांत्रिक बिघाडामुळे ही मेट्रो बंद पडल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले. तब्बल ३० मिनिटे ही मेट्रो बंद होती. त्यावेळी सर्व वयोगटातील प्रवासी त्यामध्ये अडकून पडले होते. मेट्रो स्थानकात मेट्रो आल्यावर दरवाजे उघडलेच नाहीत. त्यामुळे सुमारे अर्धा तास प्रवासी आतमध्ये अडकून पडले होते. त्यानंतर मेट्रोने प्रवाशांना त्यांचे पैसे परत केले.

(हेही वाचा विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या बसचा ४ तास संपर्क तुटला! पालकांमध्ये उडाला गोंधळ)

१ टक्का अधिभार वसूल करण्याचा डाव

विशेष म्हणजे या मेट्रोसाठी जे कोचेस बनवण्यात आले आहेत, ते भारतीय बनावटीचे आहेत. त्यामुळे यात अशा अडचणी येणार, हे अपेक्षित होते. मात्र त्याची पूर्व कल्पना मेट्रो चालवणाऱ्या कंपनीने देणे गरजेचे होते. मुंबईकरांना वेळेत इच्छित स्थळी पोहचायचे असेल, तर मेट्रो उत्तम पर्याय ठरू शकतो, पण आता मेट्रो २ ए ही बेभरवशाची बनली आहे. महाविकास आघाडीने या मेट्रोचे घाईघाईने उदघाटन केले, त्यामागे १ टक्का अधिभार वसूल करण्याचा डाव सरकारचा आहे का, अशी शंका येते. हा अधिभार घेण्यास कुणाची हरकत नाही, पण असा खोळंबा करू नका, असे माहिती अधिकार अनिल गलगली म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.