मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पदाचा भार स्वीकारून तीन महिने पूर्ण होत नाही तोच श्रावण हर्डीकर यांच्या बदलीचे आदेश निघाले. हर्डीकर यांची बदली व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महा मेट्रो), नागपूर या पदावर झाली आहे. त्यामुळे आता कुठे शहर विभागासह इतर खात्यांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करून त्यांनी कामाला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांच्या या रिक्त जागी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अतिरीक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली आता शासनाने व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महा मेट्रो), नागपूर या पदावर केली आहे. त्यामुळे या पदाचा कार्यभार महापालिका आयुक्त, मुंबई महानगरपालिका यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार डॉ. नितीन करीर यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा असे त्यांच्या नियुक्तीच्या आदेशात म्हटले आहे.
(हेही वाचा – Eknath Shinde : नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा)
श्रावण हर्डीकर यांनी ३ मे २०२३ रोजी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार (पश्चिम उपनगरे) यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर ते लगेच मसुरीला २८ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी निघून गेले. या कालावधीत या पदाचा अतिरीक्त कारभार सहआयुक्त रमेश पोवार यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच हर्डीकर यांनी अतिरीक्त आयुक्त पदाच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे प्रत्यक्षात दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत त्यांनी काम केले असून आता कुठे कामाचा गती वाढत जात असतानाच त्यांची बदली झाल्याने आता त्यांच्या रिक्त जागी कोण? कोणाची वर्णी या पदावर लागणार याचे अंदाज बांधले जात आहेत.
हर्डीकर हे भारतीय प्रशासन सेवेतील २००५ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविदयालयातून बी. इ. इन्स्ट्रूमेंटेमेशन ही पदवी त्यांनी संपादीत केली. सन २००४ मध्ये त्यांची भारतीय राजस्व सेवेत निवड झाली, त्यानंतर सन २००५ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत ते संपूर्ण भारतातून सातव्या क्रमांकाने तर महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community