महापालिकेतील भ्रष्टाचाराचा जाब विचारण्यासाठी येत्या १ जुलै रोजी उबाठा शिवसेनेच्यावतीने महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व उबाठा शिवसेनेचे नेते व आमदार आदित्य ठाकरे करणार असल्याची घोषणा उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. परंतु एक जुलै रोजी महापालिका कार्यालय बंद असून उबाठा शिवसेना हे बंद असलेल्या महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. शनिवारी महापालिका मुख्यालय बंद असल्याने त्यादिवशी आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्तांसह अधिकारी कर्मचारीच नसल्याने शिवसेना नक्की महापालिकेवर मोर्चा काढणार आहे की त्या वास्तूवर काढणार आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई महापालिकेत रस्त्यांच्या नावाने, जी-२०च्या नावाने दिवसाढवळ्या उधळपट्टी सुरू आहे, रस्ते घोटाळा, खडी घोटाळा दिवसाढवळ्या सुरू आहे. नगरसेवक असतात, त्यावेळी प्रस्तावांवर सर्व पक्षीय प्रतिनिधींसमोर चर्चा होऊन मंजुरी नामंजुरी होते. त्यानंतर कंत्राट दिले जाते. आता मुंबईला मायबापच राहिलेला नाही, सगळी उधळपट्टी सुरू आहे, असे सांगत उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारविरुध्द असंतोषाला वाचा फोडण्यासाठी १ जुलैला मुंबई महापालिकेवर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली.
(हेही वाचा – International Yoga Day : महानगरपालिका मुख्यालयात चक्क दुपारी भरवले योग शिबिर)
विशेष म्हणजे मुंबई महापालिकेला शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे शनिवार आणि रविवारी महापालिका कार्यालर्यालयांसह मुख्यालय बंद असते. त्यामुळे या सुट्टीच्या दिवशी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढून उबाठा शिवसेना नक्की काय साध्य करणार आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. उबाठा शिवसेनेने या मोर्चासाठी शनिवारचाच दिवस का निवडला हा आता सर्वांच्याच संशोधनाचा भाग बनला असून ज्या दिवशी महापालिकाच बंद असते, त्या बंद असलेल्या महापालिकेच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन उबाठा शिवसेना केवळ मोर्चा काढून आपली ताकद दाखवण्याचा आणि शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे. शनिवारी बहुतांशी शिवसैनिकांना सुट्टी असल्याने मोर्चात त्यांना सहभागी होऊन गर्दी वाढवण्याच्या दृष्टीकोनातून शनिवारचा दिवस शिवसेनेने निवडलेला असावा असे बोलले जात आहे. आजवर अशाप्रकारचे कोणतेही मोर्च हे कार्यालयीन वेळ आणि दिवसांमध्ये काढले गेले आहेत.
मुंबई महापालिकेत मागील २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता असून मागील वर्षभराचा कालावधी सोडला तर ठाकरेंच्या इशाऱ्यावरच महापालिकेचा कारभार त्या त्या वेळच्या महापालिका आयुक्तांनी हाकला असून त्या त्या समिती अध्यक्षांनी मातोश्रीच्या निर्देशानुसारच काम केलेले आहे. त्यामुळे महापालिकेत मागील वर्षभरातच भ्रष्टाचार होऊ लागला आहे आणि त्यामुळे ठाकरेंना मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मागील अडीच वर्षांमध्ये विद्ममान महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना आपल्या तालावर नाचवत काम करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना चहल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत मोर्चे काढताना सामोरे जाण्याची हिंमत नसल्याने त्यांनी शनिवारचा दिवस निवडला असावा असेही बोलले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community