भाजपची नालेसफाई पाहणी; गेले लोढा कुणीकडे

138

भारतीय जनता पक्षाच्यावतीने सध्या नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यात येत आहे. ०६ एप्रिलपासून भाजपचे नेते व आमदार ऍड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली हा पाहणी दौरा विविध भागात करण्यात येत आहे. परंतु या सर्व नालेसफाई कामाच्या पाहणी दरम्यान भाजपचे मुंबई अध्यक्षच गायब असल्याचे दिसून येत आहेत. भाजपच्या सेवा सप्ताहाच्या निमित्ताने या नाले सफाईच्या पाहणीचा कार्यक्रम आखला असला तरी भाजपच्या मुंबई अध्यक्षांचे दर्शन कुठेही या पाहणी दौऱ्याच्या कार्यक्रमात दिसले नाही. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यावर जबाबदारी टाकल्यानंतर, त्यांनी मुंबई ढवळून काढायला सुरुवात केली आहे. पण तेव्हापासून लोढा यांनी संघटनात्मक जबाबदारीतून काढता पाय घेतला असून, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोढा हे शेलारांमुळे निर्धास्त झाले का असाही सवाल उपस्थित होत आहे.

सेवा सप्ताहाच्या निमित्ताने कामांची पाहणी 

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाचे विकेंद्रीकरण करत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ऍड. आशिष शेलार यांना निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले. त्यानंतर शेलार यांनी पुन्हा एकदा सन २०१७ च्या निवडणुकीच्या धर्तीवर मुंबई पिंजून काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्याअंतर्गत त्यांनी  मुंबईची तुंबई बनवण्यास कारणीभूत असलेल्या नाल्यांच्या सफाई कामांची पाहणी करण्यासाठी दौरे आयोजित केले आहेत. भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने ६ एप्रिल ते १४ एप्रिल हा सेवा सप्ताह साजरा केला जात असल्याने, या सेवा सप्ताहाचे औचित्य साधून नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे.

लोढा गेले कुठे 

पहिल्या दिवशी खार गझधरबंद नाला, नॉर्थ एव्हन्यू, एस.एन.डी.टी. नाला, कोलडोंगरी नाल्याची पाहणीपासून सुरु केलेल्या या दौऱ्यामध्ये आजवर विलेपार्ले पूर्व, जुहू, वर्सोवा, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर आदी भागांची पाहणी केली असून मंगळवारी ते चेंबूर, शीव, अँटॉप हिल आदी भागातील नाल्यांची पाहणी करणार आहेत. मात्र, तीन दिवस केलेल्या पाहणीदरम्यान एकदाही मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचे दर्शन घडलेले नाही. त्यामुळे लोढा गेले कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

( हेही वाचा: चेंबूर, ट्राॅम्बेमधील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या यामुळे होणार कमी )

आता शेलार आणि भातखळकरच मुंबईचे वाली

मागील काही वर्षांपासून लोढा यांच्या मवाळ व्यक्तीमत्वामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली होती. परंतु निवडणूक संचलन समितीचे अध्यक्ष शेलार यांना एकप्रकारे भाजपने मुंबई शॅडो अध्यक्ष बनवले आहे. त्यामुळे शेलार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर लोढा यांनी आता मागेच राहणे पसंत केल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे लोढा यांचा सक्रिय सहभाग कमी झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे लोढा हे शेलार आणि अतुल भातखळकर यांच्यावर जबाबदारी सोपवत निर्धास्त झाल्याचेही बोलले जात असून आता शेलार आणि भातखळकर हेच आता भाजप मुंबईचे वाली असल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.