शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनीही दसरा मेळाव्यावर दावा केल्याने, सध्या ठाकरे आणि शिंदे गट हा वाद आणखी तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाजी पार्कवर दोन्ही बाजूंनी परवानगीसाठी महापालिकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाला महापालिकेने परवानगी दिल्यास शिवसेना न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहे.
खरी शिवसेना कोणती हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, दुसरीकडे शिवसेनेचा पारंपारिक मेळावादेखील चर्चेत आला आहे. दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो. राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातून शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. शिवसेनेने शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी महापालिकेकडे परवानगीदेखील मागितली आहे. मात्र, दुसरीकडे शिंदे गटाने दसरा मेळाव्यावर दावा सांगितला आहे.
( हेही वाचा: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचा मान कोणाला? )
…तर आम्ही न्यायालयात दाद मागणार
शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आमचा असल्याचे म्हटले होते. तसेच, परवानगीसाठी अर्ज देखील केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने परवानगी दिली नाही, तर आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे, शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी म्हटले. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे असा वाद रंगण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community