राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानावर संपकरी एसटी कामगारांनी हल्ला केला, त्यावेळी नागपूरमधून या हल्ल्याचे नियंत्रण एक व्यक्ती करत होती, पोलीस त्या सूत्रधाराच्या शोधात होते, अखेर पोलिसांनी संदीप गोडबोले या व्यक्तीला अटक केली आहे.
सदावर्तेंनी व्हॉट्सअॅपवरून ‘त्या’ सूत्रधाराशी संवाद साधला
‘त्या’नागपूरच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. संदीप गोडबोले हा नागपुरातील जलालखेडा भागातील राहणारा आहे. पवारांच्या घरावर हल्ल्याच्या आधी संपकरी एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी व्हॉट्सअॅपवरून नागपुरातील त्या सूत्रधाराशी संवाद साधला होता. त्यामुळे पोलीस त्या व्यक्तीच्या शोधात होते. अखेर पोलिसांनी त्या व्यक्तीचा ठावठिकाणा शोधून त्याला अटक केली. बुधवारी, १३ एप्रिल रोजी मुंबई पोलिसांचे पथक नागपुरात आले आणि त्यांनी गणेशपेठ पोलिसांच्या मदतीने गोडबोले यांना अटक केली.
(हेही वाचा गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी)
न्यायालयात काय घडले?
या प्रकरणात सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना आरोपी बनवण्यात आले आहे. एसटी कामगारांकडून सदावर्ते यांनी ३ कोटीहून अधिक रकम जमवली आहे. त्यातील ८० लाख रुपये जयश्री पाटील यांच्याकडे होते. सध्या जयश्री पाटील फरार आहेत, असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी गिरगाव न्यायालयात सांगितले. पवारांच्या घरावर हल्ला सुनियोजित होता, त्यासाठी सदावर्ते यांच्या घरत बैठक झाली होती, त्यांच्या डायरीत सगळे तपशील आहे, यात पैशाचा व्यवहार झाला आहे, त्यामुळे या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असे प्रदीप घरत यांनी न्यायालयाला सांगितले.
Join Our WhatsApp Community