राऊत बंधू धमकी प्रकरणात कांजूरमार्ग पोलिसांनी ठाण्यातून मयूर शिंदे याला अटक केली आहे. या प्रकरणातील ही पाचवी अटक असून यापूर्वी धारावीतून मुन्ना याला अटक करण्यात आल्यावर त्याच्या चौकशीत मयूर शिंदेचे नाव समोर आले होते.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांना ८ जून रोजी जीवे मारण्याची धमकी फोनवरून देण्यात आली होती. तसेच त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली होती. १० जून रोजी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करून गोवंडी येथून रिजवान अन्सारी आणि शाहिद अन्सारी यांना अटक करण्यात आली होती. या दोघांच्या अटकेनंतर राऊत बंधूंना धमकी देणारी व्यक्ती तिसरीच असल्याचे समोर आले होते. अटक करण्यात आलेल्या रिजवान आणि शाहिद यांच्या नावावर धमकी देण्यात आलेला मोबाईल आणि सिम कार्ड विकत घेण्यात आले होते. दरम्यान कांजूरमार्ग पोलिसांनी धारावीतून मुन्ना आणि त्याच्या साथीदाराला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत राऊत बंधू यांना धमकी देणारा मुन्ना हा होता, मुन्नाने मयूर शिंदेच्या सांगण्यावरून ही धमकी दिल्याचे समोर आल्यानंतर कांजूरमार्ग पोलिसांनी बुधवारी रात्री मयूर शिंदे याला ठाण्यातून त्याच्या कार्यालयातून अटक करण्यात आली आहे. गुरुवारी त्यांना मुलुंड महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – मागचं सरकार होतं आपल्या घरी, आताचं सरकार आहे तुमच्या दारी – देवेंद्र फडणवीस)
मयूर शिंदे हा राऊत बंधूचा निकटवर्तीय मानला जातो, तसेच त्याच्यावर भांडुप, मुलुंड परिसरात अनेक गुन्हे दाखल असून त्याला मोक्का देखील लावण्यात आला होता अशी माहिती सूत्रांनी दिली. मयूर शिंदे सध्या ठाण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महानगर पालिकेच्या निवडणूकीची तयारी करीत होता, त्यासाठी तो ठाण्यातील एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या संपर्कात होता अशी ही माहिती समोर येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community