पवारांच्या घरासमोरील आंदोलन, गुणरत्न सदावर्तेंना अटक

185

न्यायालयात एसटी कर्माचा-यांची बाजू मांडणा-या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी शुक्रवारी संध्याकाळी अचानक मुंबई पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यानंतर आता मुंबई पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी दुपारी एसटी कर्मचा-यांनी दगडफेक केली.

सदावर्ते यांनी चिथावणीखोर भाषणं दिल्यामुळेच आंदोलनकर्त्यांनी हा हल्ला केल्याचे पुरावे मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे चौकशी करण्यासाठी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता शुक्रवारी रात्री सदावर्ते यांना गांवदेवी पोलिसांनी अटक केली आहे.

(हेही वाचाः पवारांच्या बंगल्यावर नेमके धडकले कोण? आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांना थांगपत्ता नाहीच)

सदावर्तेंना अखेर अटक

शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचा-यांनी आक्रमक आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांकडून यावेळी शरद पवार यांच्या घरावर दगड आणि चप्पलफेक करण्यात आली. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. एसटी कर्मचा-यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रक्षोभक भाषण केल्यामुळेच आंदोलनकारी एसटी कर्माचा-यांनी पवारांच्या घरावर आंदोलन केल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे याची चौकशी करण्यासाठी सदावर्ते यांना गांवदेवी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सदावर्ते यांची दीड तास चौकशी केल्यानंतर अखेर आता सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे.

माझी हत्या होऊ शकते

दरम्यान या कारवाईनंतर सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी हत्या होऊ शकते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात माझ्या पत्नीने तक्रार दिली आहे. आणि मला कोणतीही नोटीस न देता पोलिसांकडून बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः एसटी कर्मचा-यांच्या भावना भडकावणारे कोण? पवारांच्या घराबाहेरील आंदोलनानंतर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया)

काय आहे प्रकरण?

आझाद मैदानावर एसटी कर्मचा-यांचे गेल्या पाच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर गुरुवारी आझाद मैदानात आंदोलनकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला होता. त्यावेळी सदावर्ते यांनी एसटी कर्मचा-यांच्या या स्थितीला शरद पवार जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या या विधानामुळेच चिथावलेल्या एसटी कर्मचा-यांनी शरद पवार यांच्या घरासमोर आक्रमक आंदोलन केल्याचा संशय पोलिसांना होता.

कारवाई करा- मुख्यमंत्री

शरद पवार यांच्या घरावरील आंदोलनानंतर यामागे नेमका कोणाचा हात आहे याचा शोध आता घेण्यात येत आहे. नेत्यांच्या घरावर हल्ला करणे हे अत्यंत निंदनीय आहे. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आंदोलनकर्त्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

(हेही वाचाः एसटी संपकरी आक्रमक, अनिल परबांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.