दोन वर्षांत मुंबईतील रस्ते होणार खड्डेमुक्त, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत आयुक्तांचा दावा

107

मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाला वेग देण्यात आला असून, येत्या दोन वर्षांत मुंबई खड्डे मुक्त होईल, असा दावा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत केला. मुंबई महानगरातील रस्त्यांच्या कामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी, 23 जुलै रोजी आढावा घेतला. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे लवकरात लवकर भरून, वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी महानगरपालिका केली.

दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील

मुंबईत टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची बांधणी केली जात आहे. मुंबई पालिका क्षेत्रात आतापर्यंत सुमारे ९८९.८४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्ते देखील सुधारण्याच्या दृष्टीने काँक्रिटीकरणाला वेग देण्यात आला आहे. सिमेंट काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून, पर्यायाने परीरक्षणाचा खर्च देखील कमी होतो. २०२२-२०२३ मध्ये २३६.५८ लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण काम होत आहे. त्यासाठी २ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. आणखी तब्बल ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित आहे. उर्वरित ४२३.५१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण २०२३-२०२४ मध्ये हाती घेण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील, अशी माहिती आयुक्त चहल यांनी दिली. यापुढे रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करताना ठराविक अंतरावर पाण्याचा निचरा करणारे शोषखड्डे देखील तयार केले जाणार आहेत, जेणेकरून पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवणार नाही. सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यांच्या नवीन निविदांमध्ये त्यादृष्टीने अटींचा समावेश देखील करण्यात आला आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

(हेही वाचा शिंदे गटाला मनसेत विलीन व्हायचे असेल तर स्वागतच – राज ठाकरे)

४ हजार ९०० कोटींचा खर्च

मुंबईत यंदा ४०० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणाची जी कामे प्रस्तावित आहेत, त्यामध्ये शहर विभागात ५० किलोमीटर अंतराच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ८०० कोटी, पूर्व उपनगरात ७५ किलोमीटर अंतराच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ६०० कोटी तर पश्चिम उपनगरात २७५ किलोमीटर अंतराच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ३ हजार ५०० कोटी असा एकूण ४ हजार ९०० कोटींचा खर्च करावा लागणार आहे. यामध्ये १३.४० मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण पॅसेजमध्ये (२०० मिलिमीटर जाड काँक्रिट थराचा रस्ता) करण्यात येतील. तर १३.४० मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांची सुधारणा (२८० मिलिमीटर जाड काँक्रिट थर) सिमेंट काँक्रिटीकरणमध्ये करण्यात येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.