राऊतांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट, १८ जुलैला हजर राहण्याचे आदेश

133

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी हजर राहण्याचे आदेश देऊनही शिवडी न्यायालयासमोर सोमवारी राऊत हजर झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने राऊत यांच्या नावे जामीनपात्र वॉरंट बजावून त्यांना १८ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले. राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. त्या प्रकरणी उपरोक्त वॉरंट बजावण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

मेधा सोमय्या यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या काही सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम आणि देखभालीच्या शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आपण गुंतल्याचा आरोप करणारे वृत्त १५ व १६ एप्रिलला प्रसिद्ध झाले होते. ते वाचून आपल्याला धक्का बसला. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्ये ही बदनामीकारक आहेत. सर्वसामान्यांच्या नजरेत आपली बदनामी करण्यासाठी ही विधाने करण्यात आल्याचा दावाही मेधा यांनी केला.

नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे महानगर किंवा न्यायदंडाधिकारी फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू करतात. त्याचाच भाग म्हणून प्रतिवादीला न्यायालयात हजर राहावे लागते. शिवडी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे मेधा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत, राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि पूर्णपणे बदनामीकारक असल्याचे म्हटले होते.

(हेही वाचा – Maharashtra Assembly session: राज्यात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा)

तसेच राऊत यांना नोटीस बजावून मानहानीच्या आरोपाखाली फौजदारी कारवाई सुरू करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी मेधा यांच्या तक्रारीची दखल घेत राऊत यांना समन्स बजावून सोमवारी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र राऊत न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे आता न्यायालयाने त्यांच्या नावे जामीनपात्र वॉरंट बजावून त्यांना १८ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.