– सचिन धानजी
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून (Mumbai South Central Lok Sabha Constituency) विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाची घोषणा अद्याप झाली नसली तरी प्रत्यक्षात उबाठा शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे अनिल देसाई यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. परंतु शेवाळे यांची उमेदवारी पक्की असली देसाई यांच्या उमेदवारीने त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केले जात आहे. परंतु एका बाजुला जनसामान्यांमध्ये मिसळून आवाज उठवणारे व्यक्तीमत्व तर दुसरीकडे पक्षाची प्रशासकीय बाजू मांडणारे आणि कामगार संघटनेचे नेतृत्व करणारे व्यक्तीमत्व अशी ही लढत ठरणार आहे. त्यामुळे यांच्यात कोण सरस ठरणार हे आता मतपेटींमधून स्पष्ट होणार आहे.
अभ्यासू खासदार म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न
दक्षिण मध्य मुंबईतून (Mumbai South Central Lok Sabha Constituency) राहुल शेवाळे हे प्रथम सन २०१४ आणि त्यानंतर २०१९मध्ये निवडून आले. स्थायी समितीचे अध्यक्ष असताना शेवाळे हे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे पहिल्या प्रयत्नातच खासदार बनलेल्या शेवाळे यांना २०१९मध्ये पुन्हा संधी मिळाली आणि ते मोठ्या फरकाच्या मतांनी निवडून आले होते. शेवाळे यांनी माहीम दादर, धारावी, वडाळा, शीव कोळीवाडा, चेंबूर आणि अणुशक्ती नगर या सर्व मतदार संघांमध्ये आपली छाप निर्माण करत केंद्राच्या स्तरावरील प्रश्नांना वाचा फोडतानाच एक अभ्यासू खासदार म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता त्यांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यनेता असलेल्या शिवसेनेत सहभागी होत दक्षिण मध्य मुंबईतून ते निवडणूक लढवणार आहे. शिवसेनेची अधिकृत यादी प्रसिध्दी झाली नसली तरी या मतदार संघातून शेवाळेंना उमेदवारी दिली जाणार हे पक्के आहे. Mumbai South Central Lok Sabha Constituency
(हेही वाचा UBT : …आता दै. ‘सामना’लाही विसरली उबाठा शिवसेना!)
स्थानिय लोकाधिकारी समिती महासंघाचे प्रमुख नेता
मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अंतिम झालेला नाही. मात्र, ज्या मतदार संघांमध्ये काही तिढा नाही यापैकी १७ मतदार संघांमध्ये शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये दक्षिण मध्य मुंबईत (Mumbai South Central Lok Sabha Constituency) सर्वांत शेवटी अनिल देसाई यांचे नाव जाहीर केले आहे. अनिल देसाई हे उबाठा शिवसेना पक्षाचे सचिव आहे. तसेच उध्दव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आहेत. विशेष म्हणजे राज्यसभा सदस्य म्हणून ते २०१२पासून आजमितीस कार्यरत आहेत. स्थानिय लोकाधिकारी समिती महासंघाचे प्रमुख नेता असून आजवर त्यांनी केवळ दक्षिण मुंबईतच आपले कार्य सीमित ठेवले होते. परंतु दक्षिण मुंबईच्या बाहेर कधीही न डोकावणाऱ्या देसाई यांना शेवाळे हे बाजुला होताच दक्षिण मध्य मुंबईत लक्ष घालण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे देसाई यांनी मागील काही महिन्यांपासून आपला खासदार निधीही दक्षिण मध्य मुंबईत वापरुन व्यायामाची साधने, बसण्याची आसने, छत आदी प्रकारची कामे करून देण्यास सुरुवात केली.
काय आहे दोन्ही उमेदवारांमधील वैशिष्ट्ये?
राहुल शेवाळे
- दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले
- चार वेळा महापालिका स्थायी समिती अध्यक्ष म्हणून राहिले
- शिवसेनेत यापूर्वी तिकीट नाकारल्याने अपक्ष राहत नगरसेवक म्हणून निवडून आले होते
- जनसामान्यांमधील लोकप्रतिनिधी म्हणून ओळख
- केंद्र आणि राज्यासंदर्भातील विविध प्रश्नांची उकल करत न्याय देण्याचा प्रयत्न
- विभागातील रेल्वे जागेवरील झोपड्यांचा पुनर्विकास
- धारावी प्रकल्पांमध्ये रेल्वे जागेवरील कुटुंबांचा समावेश
- धुळमुक्त मुंबईसाठी स्थायी समिती अध्यक्ष असताना केलेले प्रयत्न, आता महापालिकेकडून राबवली जाते मोहिम
अनिल देसाई
- स्थानिय लोकाधिकारी समिती महासंघाचे नेते
- सन २०१२ आणि त्यानंतर २०१८मध्ये राज्य सभेवर निवड
- दोन टर्म राज्य सभा सदस्य म्हणून मिळणाऱ्या खासदार निधीचा वापर दक्षिण मुंबईतच
- उध्दव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी
- पक्षाचे सचिव म्हणून प्रशासकीय कामांमध्ये महत्वाची भूमिका
- जनतेमध्ये मिसळून राजकीय प्रश्न हाताळण्याचे कौशल्य नाही
- पक्षाच्या महत्वाच्या बैठका आणि निर्णयांमध्ये महत्वपूर्ण भूमिका