स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होण्याआधी राज्यातील काही जिल्ह्यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई उपनगर जिल्ह्याचाही समावेश आहे. उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची जागा आता राजेंद्र भोसले घेतील.
( हेही वाचा : MPSC मार्फत ८ हजार १६९ पदांसाठी मेगाभरती! अर्ज करण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ)
२००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले राजेंद्र भोसले हे अहमदनगरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांची बदली मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे. उपनगरच्या विद्यमान जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची बदली विक्रीकर विभागात (मुंबई) सहआयुक्त पदी करण्यात आली आहे. त्याशिवाय सिडकोमध्ये मुख्य प्रशासकपदी कार्यरत असलेल्या सनदी अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांना बीडच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली आहे. त्या २०११ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांची जागा बीडचे विद्यमान जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा घेतील. तर सिद्धराम सलीमठ (२०११ बॅच) यांना अहमदनगरच्या जिल्हाधिकारी पदी बढती देण्यात आली आहे.
या आधी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडताच शिंदे-फडणवीस सरकारने आयएएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या होत्या. राजेश पाटील, अश्विन मुद्गल, अजय गुल्हाने, दीपक सिंगला, भाग्यश्री बानायत आणि डॉ. इंदुरानी जाखर यांचा त्यात समावेश होता. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९२ च्या तुकडीतील सहा सनदी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिव पदी पदोन्नती देण्यात आली होती. यामध्ये वित्त विभागाचे ओम प्रकाश गुप्ता, नियोजन विभागाचे राजगोपाल देवरा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मिलिंद म्हैसकर, राजशिष्टाचार विभागाच्या मनीषा पाटणकर-म्हैसकर, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी आणि सामान्य प्रशासन विभागाच्या सीमा व्यास यांचा समावेश होता. पदोन्नती मिळण्यापूर्वी हे अधिकारी प्रधान सचिव पदावर कार्यरत होते.
Join Our WhatsApp Community