मुंबईतील नालेसफाईचे काम ७५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केल्यानंतर आता भाजपनंतर काँग्रेसनेही गाळाने आणि कचऱ्याने भरलेल्या नाल्यांचे दर्शन मुंबईकरांना घडवून महापालिकेतील सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनाच्या दाव्यांचा पोलखोल केला आहे. काँग्रेस पक्ष हा राज्यात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असून त्यांनी शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. गुरुवारी त्यांनी नाल्यांची पाहणी करून भरलेल्या गाळ व कचऱ्यामुळे नालेसफाईचा १०० टक्के दावा चुकीचा असल्याचे सांगत कंत्राटदार आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार या नालेसफाईत झाल्याचा आरोप मुंबई काँग्रेसने केला आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात या नालेसफाईमुळे पाणी तुंबून लोकांच्या घरादारांमध्ये पाणी शिरुन मुंबईकर जनतेला त्रास सहन करावा लागण्याची भीती वर्तवली जात आहे.
संपूर्ण मुंबई पाण्याखाली जाण्याची भीती वर्तवली आहे!
मुंबईतील नालेसफाईचे काम पूर्ण झाल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर, सभागृहनेत्या विशाखा राऊत आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शहर व पश्चिम उपनगरातील नाल्यांची पाहणी करून या कामाबाबत समाधान व्यक्त केले होते. त्यानंतर भाजपचे ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी विभागातील आमदार व नगरसेवकांसह या भागातील नाल्यांची पाहणी करून गाळाने भरलेल्या नाल्यांचे दर्शन घडवत यंदा ईशान्य मुंबई पाण्याखाली जाण्याची भीती वर्तवली आहे. मात्र, आता भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही कचरा अणि गाळाने भरलेल्या नाल्यांचे दर्शन घडवत संपूर्ण मुंबई पाण्याखाली जाण्याची भीती वर्तवली आहे.
(हेही वाचा : मिठी नदीवरी पूल 5 महिन्यांत बांधून पूर्ण)
७० कोटी खर्चून नालेसफाई नाही!
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा तसेच मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमवेत गुरुवारी धारावी ९० फुटी रस्त्यावरील कामराज चौकाच्या बाजुला असलेला नाला, घाटकोपर लक्ष्मी नगर नालाा, गोवंडी शिवाजी नगर, बोरीवली गोराई नाला, कांदिवली पश्चिम लालजीपाडा आदी नाल्यांची पाहणी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना भाई जगताप यांनी सर्व नाले गाळ व कचऱ्यानेच भरलेले आहेत. महापालिका प्रशासनाने यावर्षी ७० कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, त्या तुलनेत नालेसफाईचे काम पार पाडल्याचे दिसत नसल्याचे सांगितले. त्यामुळे संबंधित कंत्राटदार व महापालिकेचे अधिकारी यांच्या संगनमतातील हा भ्रष्टाचार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
नाल्यांमधून काढलेला गाळ नाल्यांलगतच ठेवला!
नाल्यांमधून काढलेला गाळ नाल्यांलगतच ठेवण्यात आलेला असून कंत्राटदाराने त्या गाळाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. मात्र पावसाळा तोंडावर आलेला असताना अद्याप हा गाळ उचलण्यात आलेला नाही. परिणामी पावसाळ्यात हाच गाळ पुन्हा नाल्यांमध्ये जावून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जगताप यांनी व्यक्त केली. या पाहणीमध्ये मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी आमदार चरणसिंग सप्रा, खजिनदार भूषण पाटील आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा :उन्मळून पडलेल्या झाडांचा असाही केला नगरसेवकाने उपयोग)
कांदिवली पश्चिम लालजीपाडा
- उंची : ३ फूट
- खोलीकरण : २ फूट
- गाळ : दीड फूट
बोरीवली गोराई नाला
- उंची : ४ फूट
- खोलीकरण : दीड फूट
- गाळ : एक फूट
शिवाजी नगर, गोवंडी
- उंची : १५ फूट
- खोलीकरण : १० फूट
- गाळ : ५ फूट