कोरोनामुळे रखडल्या पालिका निवडणुका, इच्छुक उमेदवारांना घरघर!

आधीच कोरोनाचे संकट, त्यात आता निवडणुका लागल्या तर पैसे कुठून उभे करायचे, असा प्रश्न आता इच्छुक उमेदवारांना पडला आहे.

70

राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून, पहिल्या लाटेपेक्षा या दुसऱ्या लाटेने रौद्ररुप धारण केले आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी इतकी वाढत आहे की, राज्य सरकारला पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागला आहे. जसा या कोरोनाने सर्वांना फटका बसला आहे, तसा फटका काही पालिकांच्या निवडणुकांदेखील बसला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात देशासह राज्यात आलेल्या कोरोनाने राज्यातील औरंगाबाद, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर आणि वसई-विरार महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लाबंणीवर पडल्या होत्या.

पैसा कुठून आणायचा?

२०२१ मध्ये तरी कोरोनाचे संकट कमी होऊन या रखडलेल्या निवडणुका पार पडतील, अशी आशा सर्वांना होती. मात्र यंदाही कोरोनाची दुसरी लाट आल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिणामी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांना आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र असे असले तरी या निवडणुका आता दिवसेंदिवस पुढे ढकलल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये मात्र नैराश्य आले आहे. आधीच कोरोनाचे संकट, त्यात आता निवडणुका लागल्या तर पैसे कुठून उभे करायचे, असा प्रश्न आता इच्छुक उमेदवारांना पडला आहे.

(हेही वाचाः कन्फूजन ही कन्फूजन है…सोल्यूशन का पता नही!)

इच्छुक उमेदवार पैसे खर्च करुन थकले

साधारण डिसेंबरमध्ये वसई-विरार शहर महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी वाजू लागली होती. मार्च किंवा एप्रिलमध्ये निवडणुकीचा बार उडेल, अशा आशेने वसईतील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले होते. त्यादृष्टीने महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ, सामाजिक उपक्रमांची रेलचेल यावर इच्छुक चेहर्‍यांनी मोठा खर्च केला होता. मात्र, जानेवारीनंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने, वसई-विरार शहर महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. फेब्रुवारी महिन्यात प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याबरोबरच, त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या. मात्र कोरोनामुळे महापालिका निवडणूक पुढे ढकलण्यात आली. कोरोनाचा आलेख खाली आल्यानंतर, समाजसेवेचा आव आणून नागरिकांच्या सुख-दुखाःच्या आणाभाका घेणारे इच्छुक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते आता ऐन कोरोना काळात नागरिकांच्या मदतीला धावून जाताना दिसून येत नाहीत. काही इच्छुक उमेदवारांनी तर आता खर्च तरी कुठून करायचा, असा प्रश्न उपस्थित केला आहे. नवी मुंबईतील एका इच्छुक उमेदवाराने तर खासगीत बोलताना सांगितले की, मी निवडणुकीसाठी माझे घर देखील विकले आहे. मात्र या संकटाने होत्याचे नव्हते केले. आता पुढे निवडणूक लागली तर लढायची तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवी मुंबईतही इच्छुकांनी टेकले हात

नवी मुंबईमध्ये सध्या भाजप आमदार गणेश नाईक यांचे वर्चस्व आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर, या महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. शिवसेना-राष्ट्रवादीचे मंत्री तर नवी मुंबईसाठी कामाला देखील लागले होते. भाजपच्या आशिष शेलार यांनी देखील भेटीगाठी सुरू करुन, इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साह निर्माण केला होता. शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, मनसे आणि काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी तर तयारी देखील सुरू केली होती. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मात्र, ऐनवेळी कोरोनाचे संकट आल्याने निवडणुका पुढे ढकलल्या आणि इच्छुक उमेदवारांच्या आशेवर पाणी फिरले. आधीच खर्च करुन बसलेल्या उमेदवारांना कोरोना काळात देखील नागरिकांना मदत करावी लागली. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आल्याने या उमेदवारांनी चक्क हात टेकले.

मी मागील दोन वर्षांपासून पालिका निवडणुकीसाठी तयारी करत आहे. छोटे-मोठे कार्यक्रम घेऊन, मी आतापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचत होतो. मात्र अचानक आलेल्या या संकटामुळे निवडणुका पुढे गेल्या. आता निवडणुका कधी होतील हे देखील सांगता येत नाही. त्यात असले-नसलेले सर्व पैसे मी आधीच खर्च करुन बसलो. आता निवडणुका लागल्या तर माझ्याकडे निवडणूक लढण्याइतके देखील पैसे उरले नाहीत.

-इच्छुक उमेदवार, नालासोपारा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.