मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना येत्या दिवाळीत २० टक्के बोनस तथा सानुग्रह अनुदान देण्याची मागणी दी म्युनिसिपल युनियनने केली आहे. याबाबतचे निवेदन युनियनने महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना दिले आहे.
युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात, मुंबई महानगरपालिकेच्या समस्त कायम कामगार, कर्मचारी, अधिकारी, निरिक्षकीय कर्मचारी, सुरक्षा दल कर्मचारी, आरोग्य खात्यातील आरोग्य सेविका, कंत्राटी कामगार, बहुउद्देशीय कामगार, आरसीएच – २ मधील कर्मचारी, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कर्मचारी, एनयुएचएम अंतर्गत कार्यरत असणारे कर्मचारी, तसेच बालवाडी शिक्षिका व मदतनीस यांना प्रतिवर्षाप्रमाणे सन २०२१ -२२ या आर्थिक वर्षाचे बोनस तथा सानुग्रह अनुदान देण्याबाबत मागणी करत असल्याचे म्हटले आहे.
सन २०२१- २२ या आर्थिक वर्षाच्या एकूण वित्त लब्धीच्या २० टक्के रक्कम बोनस तथा सानुग्रह अनुदान म्हणून दीपावली २०२२ पूर्वी देण्यात यावे. मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या कामगार, कर्मचारी, अधिका-यांना वर्षानुवर्षे सातत्याने विनाखंड सानुग्रह अनुदान प्रदान केले आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेता, या मागणीवर चर्चा करून निर्णय घेण्याच्या अनुषंगाने लवकरात लवकर बैठकीचे आयोजन करावे,असेही त्यांनी म्हटले आहे.
( हेही वाचा: जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांच्या कालावधीत वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय )
शिंदे- फडणवीस सरकार काय निर्णय देईल?
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा प्रश्न अखेर महापालिका मुख्यालयाऐवजी वर्षांवर घेण्यात आला होता. या बैठकीत महापालिकेसह बेस्ट उपक्रमाचे अधिकारी व कर्मचारी यांना दीपावली २०२१ निमित्त २० हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापालिकेच्या कामगार- कर्मचाऱ्यांना तब्बल साडेचार हजारांची वाढ सानुग्रह अनुदानात करून देत तात्कालिन मुख्यंत्र्यांनी जे बोलतो ते करून दाखवतो असाच संदेश दिला होता. पण यंदाही महापालिकेत प्रशासक असून राज्याचे मुख्यमंत्री बदलले आहेत. जी भरघोस वाढ आधीच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती, तशीच वाढ आता एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांचे सरकार देईल का, असा प्रश्न खुद्द महापालिका कर्मचाऱ्यांना पडला आहे.
Join Our WhatsApp Community