मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 5 जून रोजी होणा-या अयोध्या दौ-याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केल्यानंतर, आता मुस्लिम समाजानेही त्यांच्या या दौ-याला विरोध दर्शवला आहे. उत्तर प्रदेशातील मुस्लिम समाजाच्या लोकांनी या दौ-याला विरोध करण्यासाठी सिंह यांची गुरुवारी भेट घेतली. आंदोलनात सहभागी होण्यासाठी ही भेट घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
बृजभूषण यांची भेट
जोपर्यंत राज ठाकरे हे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोवर त्यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नसल्याचे बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेला शरद पवार यांनी देखील पाठिंबा दिला आहे. तर उत्तर प्रदेशातील मुस्लिम समाजाच्या लोकांनीही राज ठाकरेंच्या विरोधात आंदोलनात सहभागी होण्यासाठी बृजभूषण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे.
(हेही वाचाः तिघे एकत्र असलो तरच बहुमताचा आकडा पार करता येतो, अजित पवारांचे विधान)
सिंह यांनी दिली उत्तर भारतीयांना शपथ
जोपर्यंत राज ठाकरे हे हात जोडून उत्तर भारतीयांनी माफी मागावी. त्यांनी असे न केल्यास आम्ही लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरुन त्यांना अयोध्येत शिरु देणार नाही, अशी शपथ सिंह यांनी उत्तर प्रदेशातील उत्तर भारतीयांना दिली आहे. उत्तर भारतीयांचा अपमान हा हिंदुस्थान सहन करणार नसल्याचा नाराही त्यांनी लगावला आहे.
कोण आहेत ब्रिजभूषण सिंह?
भाजपचे ब्रिजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशच्या केसरगंज लोकसभा मतदारसंघातले खासदार आहेत. पण याआधी ते गोंडा मतदारसंघातून एकदा दोनदा नाही तब्बल सहा वेळा ते लोकसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत. उत्तर प्रदेशच्या गोंडा मतदारसंघात ब्रिजभूषण सिंह यांनी झेंडा गाढला आहे. राजकीय आखाडे गाजवणा-या ब्रिजभूषण यांनी राजकारणात येण्याआधी कुस्तीचे आखाडेही गाजवले आहेत. मातीतला पहलवान म्हणून ओळख असणा-या ब्रिजभूषण यांनी याआधी अनेकांना असमान दाखवलं आहे. त्यामुळे आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन करणं हे काही सिंह यांच्यासाठी नवीन नाही.
(हेही वाचाः चपराक खाऊन ठाकरेंचे गाल सूजले, सोमय्यांची खोचक टीका)