नगर रुग्णालय आग : आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आमने-सामने

नगर जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. या विभागाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही काम करण्यासाठी परवानगी देण्यासाठी विलंब लावला, असे राजेश टोपे म्हणाले.

अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीमध्ये ११ रुग्णांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण या घटनेवर प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या आगीला थेट आरोग्य विभाग नव्हे, तर सार्वजनिक बांधकाम विभाग कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले टोपे?

नगर जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. या विभागाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही काम करण्यासाठी परवानगी देण्यासाठी विलंब लावला. आरोग्य विभागाने या रुग्णालयाच्या इमारतीचे फायर सेफ्टी ऑडिट बनवले. तेव्हा जून महिन्यात या इमारतीच्या सुरक्षेसाठी काही महत्वाचे बांधकाम करण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे परवानगी मागण्यात आली. ही इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधली आहे. त्यांनीच या इमारतीची विद्युत यंत्रणा बसवली. या घटनेत ४ रुग्णांचा जळून मृत्यू झाला तर ६ रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला. एका रुग्णाचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप सिद्ध झाले नाही. या घटनेच्या चौकशीसाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून पुढील ७ दिवसांत अहवाल सादर करणार आहे. यामध्ये कुणाला सोडले जाणार नाही. मग त्यामध्ये आरोग्य विभाग असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असो, दोषींवर कारवाई केली जाईल.

(हेही वाचा : आता संपूर्ण एसटी होणार ठप्प?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here