बँकेला फसवणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक

147

बँकेची 1 कोटी 89 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या नेत्याला नागपुरातील लकडगंज पोलिसांनी अटक केली आहे. गुलाम अश्रफी असे त्याचे नाव असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वतः आरोपी गुलाम अश्रफीला पक्षात प्रवेश दिला होता.

पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाम अश्रफीने त्याच्या “यंग फोर्स’ या संघटनेच्या माध्यमातून शेकडो गरीब टॅक्सी चालकांसह इतर वाहन चालकांची फसवणूक केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत इतवारीत बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. गुलाम अशरफी वल्द प्यारे अशरफी (वय 40) याने 1 कोटी 89 लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 420, 406, 409, 471 या कलमांन्वये गुन्हा दाखल करून गुलाम अशरफी वल्द प्यारे अशरफी याला अटक केली.

गुलाम अश्रफी असा फसवत होता

आरोपी गुलाम अश्रफी गरीब वाहन चालकांना बँकेतून कर्ज घेऊन महागडे वाहन खरेदी करायला लावायचा, नंतर ते बँकेचे हप्ते भरण्यास अपयशी ठरल्यानंतर त्यांना सुरुवातीला बँकेच्या वसुली पथकाच्या कारवाईपासून संरक्षण द्यायचा आणि नंतर स्वतः बँकेसोबत सेटलमेंट करून हप्ते थकल्यामुळे जप्त झालेले वाहन लिलावात कवडीमोल भावात स्वतः खरेदी करायचे ही त्याची पद्धत होती. याच पद्धतीने गुलाम अश्रफीने अनेक ट्रक्स, जेसीबी, फॉर्च्युनरसारख्या महागड्या गाड्या आणि अनेक मालवाहतूक वाहन आपल्या नावावर करून घेतल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. इतकेच नव्हे तर गुलाम अश्रफीने आपण वेस्टर्न कोल फिल्ड्स कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगत खोट्या सॅलरी स्लिप आणि इतर कागदपत्रे तयार करून बँक ऑफ महाराष्ट्रातून पहिल्यांदा एक कोटी तर दुसऱ्यांदा 89 लाख रुपयांचे कर्ज उचलले.

( हेही वाचा: देशभरात साडेलाख मंदिरे! महाराष्ट्रात किती? आयआयटी प्राध्यापकांच्या अहवालातील माहिती )

अनेक गुन्हे दाखल

बँक ऑफ महाराष्ट्र आणि इतर काही वित्तीय संस्थांनी त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर सखोल तपास करून पोलिसांनी गुलाम अश्रफीला अटक केली आहे. फसवणूक झालेल्या वाहन चालकांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार द्यावी असे आव्हान पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी केले आहे. विशेष म्हणजे गुलाम अश्रफी विरोधात यापूर्वीही हत्येच्या प्रयत्नांसह मारहाण करणे, धमकावणे, खंडणी वसूल करणे, दंगल करण्याचे गुन्हे नागपूरच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.