नागपूर महापालिका क्रीडा घोटाळ्यातील आरोपींची 22 वर्षांनी निर्दोष मुक्तता

94

नागपूर महापालिकेत 2000 साली झालेल्या क्रीडा घोटाळ्याचा तब्बल 22 वर्षांनंतर निकाल लागला आहे. या घोटाळ्याप्रकरणी तब्बल 104 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एन.जी. देशपांडे यांनी मंगळवारी याबाबतचा निर्णय सुनावला आहे.

याप्रकरणी ज्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, त्यांच्यामध्ये भाजप पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच 99 आजी-माजी नगरसेवक, 6 साहित्य दुकानदार आणि 4 मनपा अधिकारी देखील निर्दोष असल्याचे सांगण्यात आले आहे.

(हेही वाचाः महापालिका निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार; राज्य निवडणूक आयोगाचे महत्वाचे आदेश)

काय आहे प्रकरण?

2000 साली भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेत क्रीडा साहित्य घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडी सरकार सत्तेत होते. या आरोपांची दखल घेत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार नगरविकास खात्याचे तत्कालीन सचिव नंदलाल यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. तत्कालीन नगरसेवकांनी क्रीडा मंडळांना साहित्य देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा दावा या समितीच्या अहवालात करण्यात आला होता.

गुन्हे शाखेकडून चौकशी

सुरुवातीला संबंधित नगरसेवकांवर स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये भाजप, काँग्रेस, रिपाई आणि काही अपक्ष नगरसेवकांची नावे होती. पण हा घोटाळा मोठा असल्याने राज्य सरकारने त्याची चौकशी गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केली. याप्रकरणी या सर्व आरोपींच्या विरोधात आयपीसीच्या कलम ४२०, ४०४ आणि ४६८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.

(हेही वाचाः राणांच्या घरावर हातोडा? मुंबई महापालिकेची नोटीस)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.