समितीच्या अहवालानंतरच होणार ‘त्या’ डॉक्टरांवर कारवाई

180

नायर रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपचारातील दिरंगाईबाबतच्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील शिफारशीनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत बोलतांना दिली.

त्रिसदस्यीय समिती गठीत

स्थायी समितीच्या बैठकीत नायर रुग्णालयातील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत झटपट सभा तहकुबी सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी मांडली होती. यावर सर्वच सदस्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावर उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण उपसंचालक डॉ.  चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली जे.जे. रुग्णालयाचे डॉ.भालचंद्र चिखलकर, खाजगी रुग्णालयातील अन्य दोन डॉक्टर यांची त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे. या समितीचा अहवाल पुढील आठ दिवसांमध्ये येणे अपेक्षित आहे.

फौजदारी गुन्हा दाखल होईल

या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. या अहवालातील शिफारशींमध्ये जर दोषी आढळून आले तर सदस्यांच्या मागणीनुसार फौजदारी गुन्हा दाखल कडक कारवाई केली जाईल. तसेच महापालिकेच्या सेवेत पुन्हा घेतले जावू नये यासाठी  डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही केली जाईल. तसेच यासाठी लोकप्रतिनिधींचीही समिती गठीत करण्याची गरज असून आरोग्य समिती सदस्य किंवा गटनेते जे सुचवतील त्यांची समिती गठीत करून रुग्णालयांमधील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल.

तरच असे होणारे प्रकार कमी होतील

कोविडच्या काळात डॉक्टर, नर्ससह रुग्णालयीन कर्मचारी तणावाखाली काम केले आहे. त्यामुळे दडपणाखाली काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे कौन्सिलिंग व्हावे यासाठी आपण स्वत: त्यांच्याशी संवाद साधत असतो. त्यांच्याशी याबाबत चांगला संवादही होत आहे. त्यामुळे अशाप्रकारे संवाद वाढला तर असे होणारे प्रकार कमी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे पुढील आठ दिवसांमध्ये अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो समितीच्या पटलावर ठेवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.