‘नमामि चंद्रभागा’ला प्रशासनाचा खोडा, लाखो रूपयांची उधळपट्टी

229

पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांशी संलग्न नद्यांमधील जलप्रदूषण कमी करण्यासाठी २०१८ साली मोठ्या थाटामाटात ‘नमामि चंद्रभागा’ हा प्रकल्प सुरु केला. पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने सुरु केलेल्या प्रकल्पात पैशांचा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला. पुण्यातून सुरु होणा-या ५ ग्रामपंचायतीतील नद्यांच्या सांडपाणी निचरा प्रकल्पासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने प्रकल्प आराखडा मंजूर केला. तरीही कंत्राटदार कंपनीला अंदाजे २२ लाख रुपये मंजूर केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या प्रकल्पासाठी प्रत्यक्ष करावयाची आर्थिक तरतूद, प्रकल्प रखडल्याने होणारे प्रदूषण आणि त्यापासून आरोग्याला झालेला धोका, अशा कात्रित ‘नमामि चंद्रभागा’ सारखा महत्त्वाकांक्षी दिशादर्शक प्रकल्प अडकला आहे.

प्रकल्प आराखड्यासाठीचा निधी संबंधित कंत्राटदार कंपनीला दिला आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडून प्रकल्प अहवाल अंतिम करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.
– मिलिंद तोंडवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

‘व्हिजन अर्थ केअर’ कंपनीकडे प्रकल्प अहवाल बनवण्याची जबाबदारी

नद्यांमधील वाढत्या प्रदूषणाची दखल घेत राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार २०१८ साली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची घोषणा केली. सोलापुरातील चंद्रभागा नदीशी संलग्न असलेल्या नद्यांसह पुण्यातील नद्यांचाही या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. या नद्यांचा प्रकल्प अहवाल बनवण्याची जबाबदारी ‘व्हिजन अर्थ केअर’ या खासगी कंपनीकडे देण्यात आली. या कंपनीकडून तयार होणा-या प्रकल्प अहवालाची तांत्रिक छाननी करणे आणि तो मंजूर करणे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे काम सोपवण्यात आले आहे. भीमा-कोरेगाव, पेरणे, राहू, मांडवगड पराटा, भिगवण या ग्रामपंचायतीत दहा हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. या भागांत सांडपाणी प्रक्रियेच्या प्रकल्प अहवालाच्या कामासाठी ‘व्हिजन अर्थ केअर’ या खासगी कंपनीला आगाऊ रक्कम देण्यात आली आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करुन अशुद्ध पाणी शुद्ध करुन ते नदीत सोडण्याच्या तांत्रिक पद्धतीबाबत ‘व्हिजन अर्थ केअर’ या कंपनीकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १८ पानी लेखी स्पष्टीकरणही मागितले आहे, परंतु यामागील भूमिका अस्पष्ट आहे.

(हेही वाचा मुंबईकरांनो, असे आहे ११ मेट्रो प्रकल्पांचे Status, कोणती मेट्रो कधी होणार सुरु?)

प्रकल्पाच्या तांत्रिक मंजुरीवर आक्षेप नोंदवला 

‘नमामि चंद्रभागा’ प्रकल्प टप्पा २ बाबत २१ नोव्हेंबर २०११ रोजी आढावा बैठक घेण्यात आली. यात पुणे जिल्हा परिषदेने प्रकल्प अहवाल तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवला असता ७०-८० मुद्द्यांसह त्याबाबत पूर्तता करण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जिल्हा परिषदेला दिले. प्रकल्प अहवाल परिपूर्ण नसल्याने त्यांनी प्रकल्पाच्या तांत्रिक मंजुरीवर आक्षेप नोंदवला आहे. याबाबतचा लेखी अहवाल ‘हिंदुस्थान पोस्ट’कडे उपलब्ध आहे. याबाबत पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हा परिषद मुख्याधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.