…म्हणून स्वबळाची भाषा करणारे नाना आले ‘बॅकफूटवर’

हायकमांडने नानांची कानउघडणी केल्याची माहिती मिळत आहे.

130

नाना पटोले… काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष. गेल्या काही दिवसांपासून स्वबळाची भाषा केल्याने हेच नाना चांगलेच चर्चेत आले आहेत. मात्र आता स्वबळाची भाषा करणाऱ्या नाना पटोले यांना दिल्लीतून कानमंत्र देण्यात आला असून, हायकमांडने नानांची कानउघडणी केल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील महाविकास आघाडीला तडा जाईल अशी वक्तव्य करू नका, असे खुद्द हायकमांडनेच नानांना सांगितल्याचे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा हायकमांडला फोन

नाना पटोले यांच्या स्वबळाच्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला होता. शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्र्यांनी स्वबळावरुन काँग्रेसला आणि विशेषतः नाना पटोले यांना झोडले होते. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट सोनिया गांधी यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर तातडीने हायकमांडने नाना पटोले यांना दिल्लीत बोलवून समज दिल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः काँग्रेसच्या नानांवर आता मुख्यमंत्रीही नाराज)

हायकमांडला हवं राज्यातलं सरकार

राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा होत असताना, हायकमांडने हे सरकार किमान चार वर्ष तरी टिकणे गरजेचे असल्याचे राज्यातील नेत्यांना सांगितले आहे. सध्या सरकार अस्थिर होईल अशी विधाने टाळा, अशी समज नाना पटोले यांना दिल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजत आहे. देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वातावरण असताना महाराष्ट्रातील ठाकरे सरकार टिकणे हे महत्वाचे आहे. हे सरकार पुढच्या लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात मोलाची भूमिका बजावेल, असा हायकमांडला विश्वास आहे. त्याचमुळे आता हे सरकार टिकवणे ही काँग्रेसची देखील जबाबदारी असल्याचे हायकमांडने नानांना समजावले.

हायकमांडकडे पक्षातूनही तक्रार

नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे राज्यातील काही नेते देखील नाराज झाले होते. काँग्रेसच्या नेत्यांनी नाना पटोले यांची हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती मिळत आहे. नाना पटोलेंच्या बेताल वक्तव्यावरुन महाविकास आघाडीत
वितुष्ट निर्माण होत असल्याची भावना, या नेत्यांनी व्यक्त केली होती.

(हेही वाचाः नाना पटोलेंचं प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.