अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यानिधी सरकारी वकिलाने भाजप नेत्यांना कशा प्रकारे खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता, याचा खुलासा केला. आमचे मित्र नटसम्राट आहे, कहाणी बनवण्यात हुशार आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना फोन टॅपिंगमध्ये पोलिसांचा कसा वापर केला, त्यावर आधी बोलावे, असा सणसणीत टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.
बेकायदेशीर फोन टॅपिंग केले हे सिद्ध झाले
पोलीस अधिकाऱ्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर करुन विरोधी पक्षाच्या लोकांवर कारवाई करण्याचे पाप देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरु झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हाताशी धरून राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग केले हे सिद्ध झाले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, परंतु त्यांना टॅपिंगचे कुणी आदेश दिले होते, हे उघड होण्यासाठी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मिर्चीच्या पैशावर पक्ष चालवणारे कोण आहेत? त्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करा, अशी मागणीच नाना पटोले यांनी केली.
(हेही वाचा महाराष्ट्र भाजप संपवण्याची काय होती टूलकीट? देवेंद्र फडणवीसांचा पुराव्यांसह गौप्यस्फोट)
राज्यात गुन्हेगारी प्रवृत्ती कुठून सुरू झाली
भीमा कोरेगावचे प्रकरण राज्यात झाले. शौर्य स्तंभावर लाखो लोक नमन करायला जातात, पण त्यादिवशी दुकाने बंद करण्यात आली होती, पिण्याच्या पाण्याची सोयही केलेली नव्हती. त्यानंतर राज्यात दंगली झाल्या. ह्या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारकडे होते, मग पहाटेचे सरकार आले, त्यावेळी हे प्रकरण केंद्र सरकारच्या एनआयकडे का दिले गेले, त्याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. राज्यात गुन्हेगारी प्रवृत्ती कुठून सुरू झाली, ह्याच्या मुळाशी गेले पाहिजे. गुन्हेगारी वाढू नये हीच सर्वांची इच्छा आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर राज्यात दंगली उसळल्या, दलित समाजाच्यातील लोकांवर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी पटोले यांनी केली.
Join Our WhatsApp Community