काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विरोधकांसोबतच महाविकास आघाडीतल्या आपल्या मित्र पक्षांवरही आगपखड करत असतात. कायमंच स्वबळाचा नारा देणा-या नाना पटोलेंबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली होती. इतकंच नाही तर त्यांच्या या वक्तव्यांमुळे काँग्रेसमध्येही दोन गट पडले असून, बाळासाहेब थोरात आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यांची हायकमांडकडे तक्रार केल्याचेही समजते. पण तरीही नाना पटोले यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला आहे. सोबत राहून पाठीत सुरा खुपसणार असाल, तर तोच राग आमची ताकद बनेल, असे परखड मत नानांनी मांडले आहे. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नानांनी हा घणाघात केला.
(हेही वाचाः कोण होणार विधानसभा अध्यक्ष? पवारांनी केले स्पष्ट…)
दादांवर नाना नाराज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना स्वबळाचा नारा देऊन, त्यांना कामाला लागायला सांगितले. पण हाच स्वबळाचा नारा मी दिला तर यांना त्रास होतो, अशा शब्दांत नानांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पुण्याचे पालकमंत्री बारामतीचे आहेत, ते कोणत्याही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कामाला येत नाहीत. कमिटीवर राहायचं असेल तर पालकमंत्र्यांची सही लागते. हा जो त्रास पालकमंत्री देतात त्या त्रासाला तुम्ही आपली ताकद बनवा आणि काँग्रेसचा पालकमंत्री आणून दाखवा, असा अजब सल्ला नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांवर आपण नाराज असल्याचा संदेश त्यांनी यातून दिला.
(हेही वाचाः तुम्ही काहीही म्हणा… पण आम्ही तुम्हाला चंपा, टरबुज्या म्हणणार नाही! पटोलेंचे दादांना प्रत्त्युत्तर)
रागाला तुमची ताकद बनवा
जो त्रास आपल्याला आता होत आहे, त्याने तुम्ही खचून जाऊ नका. मानसिकदृष्ट्या स्वतःला कमकुवत करुन घेऊ नका. आपल्याला आपल्या हक्काचं जे आहे ते मिळत नसेल तर आता त्यांना घेऊ दे. पण उद्या आपण आपल्या कर्मानं आपल्या पक्षाचा माणूस पालकमंत्र्यांच्या खुर्चीवर आणू, अशी ताकद तुम्ही मनात बाळगा, अशा शब्दांत नानांनी आपल्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. त्यांना जर समझोता करायचा नसेल, आपल्या सोबत राहून आपल्याच पाठीत खंजीर खुपसायचा असेल तर आपल्याला त्याच रागाला आपली ताकद बनवायला हवी, अशा शब्दांत त्यांनी आपल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगात जोश भरवला.
मला बारामतीत प्लॅनिंग करावं लागेल
कॉंग्रेसला मानणारा बराच वर्ग बारामतीमध्ये आहे. तिथे मला प्लॅनिंग करावं लागेल. तिथे होणाऱ्या अत्याचार व्यवस्थेच्या विरोधात जो उद्रेक आहे, तो मला माहिती आहे. मात्र आपल्याला पुढे जायचे असेल तर दुष्मनाच्या घरातच जाऊन मारले पाहिजे, असा खोचक टोला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बारामतीच्या पवार पॅटर्नला लगावला.
(हेही वाचाः निष्ठेचे फुटलेले उमाळे, पण…)
चिक्कीचे काय झाले तुम्ही बघताय
लोणावळ्यातील चिक्की फार प्रसिद्ध आहे. मात्र ती मागच्या सरकारमध्ये जास्त प्रसिद्ध होती. आता त्या चिक्कीचे काय हाल झाले ते तुम्हीच बघत आहात. अशा आपल्या शैलीदार आक्रमक भाषणात पटोलेंनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही निशाणा साधला.
(हेही वाचाः देवेंद्र भाऊंची दिल्लीत चलती)
ती लहान माणसं- पवार
नानांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नानांना चांगलेच फटकारले आहे. नानांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, या गोष्टीत मी काही पडत नाही. ती लहान माणसं आहेत, त्यांच्यावर मी कशाला बोलू. एकवेळ सोनिया गांधी काही म्हणाल्या असत्या तर मी बोललो असतो, अशा शब्दांत त्यांनी नानांचा अनुल्लेख करत त्यांच्यावर टीका केली आहे.
Join Our WhatsApp Community