वादग्रस्त मुद्दे उपस्थित करून नेहमी चर्चेत राहणाऱ्या नाना पटोलेंची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात त्यांच्याजागी नवा चेहरा दिला जाईल. त्यासाठी तीन नावे चर्चेत असल्याची माहिती काँग्रेसमधील अंतर्गत सूत्रांनी दिली.
फेब्रुवारी महिन्यात रायपूरमध्ये कॉंग्रेसचे तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्याआधी पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत केली जाणार आहे. त्या अंतर्गत अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष बदलले जातील. त्यात नाना पटोलेंचाही समावेश आहे. त्यांच्या जागी सुनील केदार, यशोमती ठाकूर किंवा संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले तेव्हा बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष होते. ते महसूलमंत्री झाल्यानंतर त्यांच्या जागी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. पटोलेंच्या प्रदेशाध्यक्षपदाला पुढच्या महिन्यात दोन वर्षे पूर्ण होत आहेत. पक्षाच्या घटनेनुसार त्यांची मुदत संपलेली नाही. मात्र, नजिकच्या काळात पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, महापालिका, लोकसभा व त्यानंतर होणाऱ्या विधानसभा अशी निवडणुकांची मालिका आहे. या पार्श्वभूमीवर नवा आश्वासक चेहरा देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाणार आहे.
‘ही’ नावे चर्चेत
भाजपाला जोरदार टक्कर द्यायची झाल्यास पटोलेंच्या जागी विदर्भातलाच चेहरा द्यावा, असे प्रमुख नेत्यांचे मत आहे. त्यात सुनील केदार यांचे नाव आघाडीवर आहे. विदर्भातील तरुण आणि दमदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. विदर्भात कॉंग्रेस टिकवून ठेवण्यात केदार घराण्याचे मोठे योगदान आहे. शिवाय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पटोले यांच्याइतकाच केदार यांचाही संपर्क आहे. त्यामुळे केदार हे प्रदेशाध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
माजी मंत्री यशोमती ठाकूर याही विदर्भातल्या अमरावतीमधून येतात. राहुल गांधी यांच्या कोअर टीममधील तरुण नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांना संधी मिळू शकते. पुण्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचेही नाव या स्पर्धेत आहे. सलग चारवेळा निवडून येऊनही मागच्यावेळी त्यांना मंत्रीपदाबरोबरच विधानसभा अध्यक्षपदानेही हुलकावणी दिली होती. त्यामुळे ते नाराज आहेत. मधल्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याने, संभाव्य फूट टाळण्यासाठी त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, असे कळते.
(हेही वाचा – भाजपमध्ये जोरदार इनकमिंग होणार, मविआत पडणार मोठं खिंडार; बावनकुळेंचा दावा)
Join Our WhatsApp Community