सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून काँग्रेस पक्षात नाराजीचे वातावरण पसरले आहे. यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कार्यशैलीवर बोट दाखवले जात आहे. नाशिक मतदारसंघात घडलेल्या या गोष्टीला नाना पटोले जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. याबाबत आशिष देशमुख यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना निवेदन लिहिले आहे.
काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी हे निवेदन ट्विटवर शेअर करत म्हणाले की, ‘महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष तात्काल बदलण्याची नितांत गरज आहे. या संबंधित निवेदन मी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन यांना केले आहे.’
महाराष्ट्रात कॉंग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचा अध्यक्ष तात्काल बदलण्याची नितांत गरज आहे. या संबंधित निवेदन मी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष श्री @kharge जी यांना केले आहे.#indiannationalcongress #MallikarjunKharge #INCMaharashtra pic.twitter.com/Cubt7rVvk2
— Dr. Ashishrao R. Deshmukh (@AshishRDeshmukh) January 17, 2023
बालेकिल्ला आता काँग्रेसच्या हातातून निसटला
महाराष्ट्रातील काँग्रेसची परिस्थिती चिंताजनक, प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज असा आशिष देशमुखांनी लिहिलेल्या निवेदनाचा विषय आहे. या निवेदनातून नाना पटोलेंच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली आहे. देशमुखांनी या निवदेनात म्हटले आहे की, ‘शेतकरी, कामगार, आदिवासी, युवा वर्ग, महिला, शोषित, पिडीत, वंचित, मागासवर्गीय यांचे प्रश्न व्यवस्थित हाताळण्यासाठी तसेच संघटनात्मक कार्य करून ओबीसी, महिलांवरील अत्याचार आणि जनहितार्थ मुद्द्यांवर मार्ग काढण्यासाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये नाना पटोले यांना मोठ्या विश्वासाने काँग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली. पण तो विश्वास त्यांनी सपशेल फोल ठरवला. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. प्रदेशाध्यक्षांच्या कार्यशैलीमुळे हा बालेकिल्ला आता काँग्रेसच्या हातातून निसटला आहे, हे सर्वश्रुत आहे.’ अशी सगळी परिस्थिती निवेदनात मांडत आशिष देशमुख यांनी नाना पटोलेंना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
(हेही वाचा – नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी )
Join Our WhatsApp Community