‘युपीए’च्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुचवले होते. काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरुन संजय राऊत यांचा समाचार घेतला. राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. जो पक्ष युपीएमध्ये नाही, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असा टोला पटोले यांनी शिवसेनेला लगावला. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय आहे राऊत यांचे म्हणणे?
युपीए आणखी मजबूत व्हायला पाहिजे, असे अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांनी प्रदीर्घकाळ युपीएचे अध्यक्षपद भूषविले आहे. मात्र, सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसते. अशावेळी युपीएचे नेतृत्त्व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी करावे, असे मत संजय राऊत यांनी मांडले होते. राऊत यांच्या विधानामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मात्र, तरीही राऊत बोलत आहेत. शिवसेना युपीएचा भागच नाही. मग त्यांना याबाबत चर्चा करण्याचा किंवा मत नोंदवण्याचा अधिकारच नाही, असे पटोले यांनी टोला लगावला. संजय राऊत यावर आता काय प्रतिक्रिया देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचाः युपीए विकलांग अवस्थेत… राऊतांच्या विधानाने काँग्रेसमध्ये नाराजी!)
फडणवीसांकडे असलेला सीडीआर रेकॉर्ड खोटा
मनसुख हिरेन हत्याप्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना कॉल डिटेल्स रेकॉर्डचा उल्लेख केला होता. मात्र, हा सीडीआर खोटा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खरा सीडीआर असेल तर त्यांनी तो प्रसारमाध्यमे आणि जनतेला दाखवावा. देवेंद्र फडणवीस हे खोटा सीडीआर दाखवून राज्याला बदनाम करत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
विरोधी पक्षनेत्यासोबत एनआयएच्या अधिकाऱ्याचे फोटो
एटीएसच्या माध्यमातून चौकशी सुरू होती. जिलेटीन कुठून आले, नागपूरच्या सूत्रधारांपर्यंत सरकार पोहचले होते. खूनाची देखील चौकशी झाली. शेवटच्या टप्प्यात केंद्राचा एनआयए हा पोपट आला. परवानगी मिळत नव्हती. अखेर न्यायालयात जाऊन परवानगी घेतली. केंद्राच्या तपास यंत्रणेने रोज माहिती द्यायला हवी. परंतु, कोणतीही माहिती त्यांच्याकडून दिली जात नाही. केवळ खोटे आरोप का लावले जात आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच तपास यंत्रणा असल्यासारखे वागत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्राच्या एनआयएच्या मुख्य अधिकाऱ्याचा विरोधी पक्षनेत्यांसबोत फोटो व्हायरल झाले आहेत. कुठे भेटले हे, तपासातील मुख्य अधिकारी विरोधी पक्षनेत्याला भेटतो कसा, हा प्रश्न आहे. राज्य सरकार याबाबत लवकरच स्पष्टीकरण देईल, असे नाना म्हणाले.
(हेही वाचाः कोरोना गंभीर, पण राजकारणी राजकारणात खंबीर!)
Join Our WhatsApp Community