‘नानां’ना हवे मंत्रीपद, नितीन राऊतांची पडणार विकेट? विधानसभा अध्यक्ष होणार?

काँग्रेस हायकमांड नितीन राऊत यांच्या कामगिरीवर खुश नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. मात्र आता नाना पटोले यांना मंत्रिपदाचे वेध लागले असून, त्यांचा डोळा आता उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या खात्यावर आहे. नुकतीच नानांनी दिल्लीत हायकमांडची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. पक्ष वाढीसाठी माझ्याकडे मंत्रिपद देखील असणे तितकेच गरजेचे असल्याचे नानांनी दिल्लीत सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘नानां’चा राऊतांच्या मंत्रीपदावर डोळा?

नाना पटोले यांचा नितीन राऊत यांच्याकडे असलेल्या मंत्रीपदावर डोळा असून, हायकमांड देखील याबाबत सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. हायकमांड नितीन राऊत यांच्या कामगिरीवर खुश नसल्याची देखील खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

(हेही वाचा : दोन दिवसांच्या अधिवेशनात भाजप मैदान मारणार? अशी आहे रणनीती)

तर नितीन राऊत विधानसभा अध्यक्ष?

नितीन राऊत यांचे ऊर्जा खाते जर नाना पटोले यांना दिले, तर नितीन राऊत हे विधानसभा अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत नितीन राऊत यांचे देखील नाव असल्याची चर्चा सुरू झाली असून, पक्षाचे प्रभारी एच के पाटील यांनी संग्राम थोपटे आणि नितीन राऊत यांचे नाव पुढे केल्याची खात्रीलायक सुत्रांकडून माहिती मिळत आहे. त्यामुळे दलित मतदारांचा विचार केला तर काँग्रेस त्यांना विधानसभा अध्यक्ष बनवू शकतं

म्हणून राऊतांचे मंत्रिपद धोक्यात

नितीन राऊत हे ऊर्जामंत्री आहेत. पण ते आपल्या खात्यात छाप पाडू शकलेले नाहीत. गेल्यावर्षी त्यांनी शंभर युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर कोरोना काळात वाढीव बिलात सुधारणा करण्यात येईल, असेही आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात आघाडी सरकारने त्यांची घोषणा व मागणी फेटाळून लावली. तसेच परस्पर घोषणा करून राऊत सरकारला अडचणीत आणत असल्याच्या तक्रारी दिल्लीपर्यंत पोहचत्या केल्या आहेत. एवढेच नाही तर ऊर्जाखाते आणि जिल्हा नियोजन समितीची बैठक याव्यतिरिक्त ते फारसे इतर कार्यक्रमांमध्ये फिरकत नसल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे त्यांचे मंत्रीपद धोक्यात येऊ शकते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here