‘नानां’च्या आक्रमकतेमागे नक्की कारण काय? वाचा…

एकीकडे नाना पटोले जरी स्वबळाची भाषा करत असले, तर काँग्रेसचे मंत्री मात्र सत्तेत सुस्त असल्याचे पहायला मिळत आहे.

128

गेले दोन दिवस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे चांगलेच चर्चेत आहेत. ते म्हणजे त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे विधान असो वा विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचे विधान…पण नान पटोले हे दोन दिवसांत इतके आक्रमक का झाले, असा सवाल प्रत्येकाला प्रश्न पडला आहे. पण खात्रीलायक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांना त्यांची छाप पाडता आलेली नाही. तसेच सरकारमध्ये असूनही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हवा तसा मानसन्मान मिळत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, आता याच नाराज कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दंड थोपटले असून, ते आता अशी विधाने करू लागले आहेत.

आज जर पाहिले तर सत्तेचा पूरेपूर वापर हा काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस करताना पहायला मिळत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील काँग्रेस कार्यकर्त्यांवर भारी पडत आहेत. याचमुळे आता नाना स्वबळाची भाषा करत थोडासा दबावगट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच एक दबावगट तयार करून जास्तीत जास्त जागा पदरी पाडून घेण्यासाठीचा काँग्रेसचा डावपेच असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

काँग्रेसचा मुख्यमंत्री तरी कसा होणार?

पुढील निवडणुकीत काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा, अशी जरी काँग्रेसच्या नेत्यांची आणि खासकरून नानांची इच्छा असली, तरी सध्याच्या आकडेवारीवरून ते शक्य नसल्याचे दिसते. सध्या काँग्रेसचे ४४ आमदार विधानसभेत आहे. तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. जरी काँग्रेस स्वबळावर लढून जागा लढण्याचा विचार करत असले, तरी एकूणच सध्याची राष्ट्रवादीची घोडदौड बघता काँग्रेसचा मुख्यमंत्री भविष्यात होईल, असे वाटत नसल्याचे काही जाणकार सांगतात. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जमतेम ४४ जागा जिंकू शकली. त्या जिंकण्यासाठी देखील काँग्रेस नेत्यांना राष्ट्रवादीची मदत लागली. मग आता स्वबळाची भाषा करणारी काँग्रेस भविष्यात स्वत:चा मुख्यमंत्री तरी कसा काय बसवणार, असा प्रश्न देखील काही जाणकार विचारत आहेत. एवढेच नाही तर पक्ष जिवंत ठेवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी अशी विधाने करावी लागत असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

(हेही वाचा : कोरोना नंतर राज ठाकरेंचे झंझावाती दौरे, सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडणार)

काँग्रेसचे मंत्री मात्र सत्तेत सुस्त!

एकीकडे नाना पटोले जरी स्वबळाची भाषा करत असले तर काँग्रेसचे मंत्री मात्र सत्तेत सुस्त असल्याचे पहायला मिळत आहे. काँग्रेसचे काही मंत्री हे महाविकास आघाडीत ठिणगी पडेल, असे वक्तव्य करणे टाळत असल्याचे काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटत आहे. एवढेच नाही तर जर भाजपला महाराष्ट्राच्या सत्तेपासून आणखी काही वर्ष दूर ठेवले, तर त्याचे परिणाम देशाच्या देखील राजकारणात पडू शकतात, याचमुळे काँग्रेसचे काही नेते हे सरकार पाच वर्ष तरी टिकावे, या मताचे आहेत. हायकमांडला देखील त्यांनी राज्यातील सरकार का टिकावे हे पटवून दिल्याची माहिती मिळत आहे.

नानांनंतर नसीम खान यांचीही स्वबळाची भाषा

एकीकडे नाना पटोले हे आक्रमक होत असताना त्यांना आता काही नेत्यांची देखील साथ मिळत आहे. काँग्रेस पक्ष सर्वात जुना पक्ष असून याआधी तो राज्यातही नंबर एकचा पक्ष राहिला आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षे काँग्रेसने एकहाती सत्ता आणलेली आहे. काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात आजही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार असून स्वबळावर निवडणुका लढल्यास पक्ष संघटनाही मजबूत होण्यास मदत होईल. राज्यातील पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावरच लढवाव्यात ही भूमिका रास्त आहे, असे नसिम खान म्हणाले. काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवल्यास त्याचा पक्षाला फायदा होणार आहे. काँग्रेसला राज्यात गतवैभव प्राप्त करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घेतली भूमिका हीच पक्षाची भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा : दहावीच्या मूल्यांकनासाठी शिक्षकांना भरावा लागतोय दंड!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.