राज्यात राजकीय वातावरणात गेल्या काही दिवसांपासून उलथापालथ सुरू झाली आहे. सचिन वाझे प्रकरणानेतर राज्य सरकारमध्ये खांदेपालट होणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची जोरात मागणी सुरू होती. पण आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. राऊत यांच्या जागी ऊर्जामंत्रीपद नाना पटोले यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. वाढीव वीज बिलावरुन ऊर्जामंत्री नितीन राऊत हे विरोधकांच्या रडारवर असताना, आता हायकमांडने नितीन राऊत यांच्या जागी नाना पटोले यांना ऊर्जामंत्री करावे, असे राज्यातील नेत्यांना सुचवले आहे. काँग्रेसचे नेते सध्या दिल्लीत असून, नाना पटोले यांना ऊर्जा खाते देण्याचा निर्णय होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले आहे.
याआधी नानांकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हायकमांडने त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. भाजप सोडल्यानंतर मोदींसह भाजपवर सडकून टीका करणारे नाना सध्या हायकमांडच्या मर्जीत असल्याने आता त्यांना नवीन जबाबदारी मिळू शकते, अशी माहिती मिळत आहे.
(हेही वाचाः महावितरण म्हणते, “सोनू तुला वीज बिल भरायचं नाही का?”)
वाढीव वीज बिलावरून राऊत विरोधकांच्या रडारवर
लॉकडाऊनमध्ये आलेल्या वाढीव वीज बिलावरुन नितीन राऊत विरोधकांच्या रडारवर होते. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महावितरणच्या कार्यालयात क्लार्कचे काम करावे, म्हणजे आम्ही त्यांच्याकडे बिले घेऊन तपासणीसाठी येतो. असा खोचक टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला होता.
Join Our WhatsApp Community