काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले यांनी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अनेक बदल केले. मुळात त्यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आक्रमकपणे स्वबळाचा नारा दिला. यामुळे त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र खुद्द केंद्रीय नेतृत्वाचा सपोर्ट नानांना मिळत असल्याने, नाना पक्षहितासाठी अधिकच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. आता तर नाना पटोले यांनी आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना धक्कातंत्र देण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि महसूल मंत्री यांनी नेमणूक केलेल्या पदाधिकाऱ्यांना हटवून त्यांच्या जागी आक्रमक आणि तरुण नेत्यांना पक्षात स्थान देण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
…म्हणून त्या नेत्यांना मिळणार नारळ
मागील वर्षात केंद्र सरकार विरोधात अनेक आंदोलने काँग्रेसकडून करण्यात आली. मात्र, काही जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांनी यामध्ये साधा सहभाग देखील घेतला नाही. याचमुळे आंदोलने न करणारे काँग्रेसचे अकार्यक्षम जिल्हाध्यक्ष बदलले जाणार आहेत. त्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, उस्मानाबाद इत्यादी जिल्हाध्यक्षांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. सर्व जिल्हाध्यक्ष अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचे समर्थक असल्याची माहिती मिळत आहे. दादर येथील टिळक भवन येथे होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.
(हेही वाचाः नानांना लवकरच लॉटरी लागणार, अस्लमभाईंचा पत्ता कटणार?)
पुणे व नाशिक शहराध्यक्ष बदलणार
नाशिक व पुणे शहर या दोन्ही अध्यक्षांना राज्य कार्यकारिणीत उपाध्यक्ष केल्याने, त्यांच्या जागी अन्य दोघांची नियुक्ती केली जाणार आहे. तर रत्नागिरी व रायगडमध्ये तरुणाईला संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. रत्नागिरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले आणि रायगड जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांचे नुकतेच निधन झाले आहे. या दोन्ही जिल्ह्यांत काँग्रेसचे अस्तित्व कमी आहे. ती ताकद वाढवण्यासाठी आता नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
याआधीच नानांमुळे काँग्रेसमध्ये दोन गट
नाना पटोले यांच्यामुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडत असल्याचा आरोप काँग्रेसमधील काही नेत्यांनी केला होता. बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी दिल्ली दरबारी जाऊन थेट राहुल गांधींकडे पटोलेंची तक्रार केल्याची देखील चर्चा काँग्रेसमध्ये सुरू होती. एवढेच नाही तर नानांच्या सततच्या व्यक्तव्यांमुळे देखील काँग्रेसचे राज्यातले नेते नाराज आहेत. त्यातच आता नाना बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्या समर्थकांचा पत्ता गुल करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे आता भविष्यात पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये अंतर्गत कुरघोडी पहायला मिळाल्या, तर नवल वाटायला नको.
(हेही वाचाः म्हणून आम्ही स्वबळाची तयारी करतोय…अखेर नानांनी सांगितले कारण)