कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम घरोघरी जाऊन राबवा, पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

या संकटावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करावे ही काँग्रेस पक्षाची पहिल्यापासूनची आग्रही मागणी राहिली आहे. काँग्रेसच्या मागणीचा विचार करुन आपण योग्य तो निर्णय घ्यावा, असे नाना पटोले म्हणाले.

139

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यात लसीकरण प्रभावी ठरत असल्याचे विविध देशांतील लसीकरणावरुन दिसत आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. पण राज्य सरकारने सध्या लावलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्यांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यास अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात लसीकरण केंद्रे संख्येने कमी व दूर अंतरावर असल्याने, प्रवास करुन केंद्रावर जाऊन लस घेणे लोकांसाठी जिकिरीचे ठरत आहे. १ मे नंतर १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यावेळी लसीकरण केंद्रांवरील गर्दी वाढून संसर्ग वाढण्याचा धोका जास्त आहे. लसीकरणातील या सर्व अडचणी दूर करुन घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम राज्य सरकारने हाती घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

काय आहे पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र?

पटोले यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आपली यंत्रणा सर्व पातळ्यांवर काम करत आहे. पण कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हेच जगभरात प्रभावी अस्त्र ठरलेले आहे. इस्त्राईल सारख्या छोट्या देशाने ते करुन दाखवले आहे. अमेरिका, ब्रिटनसह इतर देशानेही लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवल्याने कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली. महाराष्ट्रानेही देशात लसीकरणाबाबत मोठी आघाडी घेऊन, १ कोटीपेक्षा जास्त लसीकरण केले आहे. ही लसीकरण मोहीम राबवण्यासाठी मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात लागणार आहे. हे लक्षात घेऊन सरकारी यंत्रणेबरोबरच, खाजगी रुग्णालयातील कर्मचारी वर्ग, स्वयंसेवी संस्था-संघटनांची मदत घेता येईल. पोलिओ या महामारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशपातळीवर मोठ्या प्रमाणात अशीच मोहीम राबवण्यात आली होती. याच धर्तीवर घरोघरी जाऊन कोरोनाची लस दिली तर कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात मोठे यश येईल, असे पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

(हेही वाचाः दादांच्या जवळच्या मंत्र्याला वाचवण्यासाठी काळेंची बदली! काँग्रेसमध्ये कमालीची नाराजी!)

काँग्रेसची आग्रही मागणी

कोरोना महामारीने मानवजातीसमोर गंभीर संकट उभे ठाकले असून, दुसऱ्या लाटेत संक्रमण मोठ्या वेगाने होत आहे. शहरी भागात मोठ्या प्रमाणात पसरलेले हे संक्रमण आता गाव-खेड्यांतही मोठ्या प्रमाणात पोहोचले आहे. वर्षभरापासून आपण या संकटाचा सामना करत आहोत. रुग्णालयात बेड्स मिळत नाहीत, रेमडेसिवीर, ऑक्सिजनअभावी दररोज लोकांचे जीव जात आहेत, हे भयानक चित्र पहावत नाही. एकीकडे जीवितहानी होत असताना अर्थचक्रही सुरळीत चालण्यास अडथळे येत आहेत. कोरोनामुळे वर्षभरात सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसलेला आहे. या संकटावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करावे ही काँग्रेस पक्षाची पहिल्यापासूनची आग्रही मागणी राहिली आहे. काँग्रेसच्या मागणीचा विचार करुन आपण योग्य तो निर्णय घ्यावा, असे नाना पटोले म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.