पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण करताना महाराष्ट्रामुळे कोरोना पसरला असे वक्तव्य केले, त्यामुळे काँग्रेस मागील ३-४ दिवसांपासून भाजपच्या नेत्यांविरोधात त्यांच्या त्यांच्या घरी आंदोलन करत आहेत. तसेच सोमवारी, १४ फेब्रुवारी रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर हल्लाबोल करण्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी दिला आहे. त्याला भाजपने प्रत्युत्तर एकेरी भाषेत दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना महाराष्ट्र काँग्रेसवर गंभीर आरोप केला होता. काँग्रेसमुळेच देशभर कोरोनाचा प्रसार झाला, असा दावा मोदी यांनी केला होता. मोदींच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. नाना पटोले यांनी सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलनाचा इशारा दिला. तर पटोले यांच्या इशाऱ्याला मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिआव्हान दिले आहे.
काय म्हटले प्रसाद लाड?
आमदार प्रसाद लाड यांनी तर नाना पटोले यांचा थेट एकेरी उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येऊनच दाखवा, असे थेट आव्हान दिले आहे. ‘नाना, तुझ्या आव्हानाला प्रतिआव्हान देतोय. तू उद्या सकाळी 10 वाजता येऊनच दाखव, नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्ही पण भाजप कार्यकर्ते नाही. सागरवर तू ये, पाहतो तू कसा परत जातो ते’, अशा शब्दात प्रसाद लाड यांनी नाना पटोलेंना आव्हान दिले आहे. दरम्यान, हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना लाड यांनी पटोले यांचा एकेरी उल्लेख टाळला आहे.
नानांच्या ‘स्वागता’साठी तयार राहा
तर मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी भाजप कार्यकर्त्यांना नाना पटोले यांच्या स्वागतासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे सोमवारी काँग्रेसने फडणवीसांच्या बंगल्यावर आंदोलन केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community