एखाद्या व्यक्तीने कोरोनावर मात केल्यानंतर त्याच व्यक्तीला पुन्हा कोरोना होऊ शकत नाही, असा समज जर तुमच्या मनात असेल तर तो गैरसमज आहे असे समजा. कारण महाराष्ट्रामध्ये कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत. यात आरोग्य सेवकांचा समावेश आहे, मात्र त्यात एका राजकीय व्यक्तीचाही समावेश झाला आहे. ही व्यक्ती कुणी साधीसुधी नसून, भाजपाचे नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे आहेत. प्रतापराव चिखलीकर यांना दुसऱ्यांदा कोरोना झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
असा समजला दुसऱ्यांदा कोरोना
संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झाले आहे. कोरोना काळात अधिवेशन असल्याने सर्व खासदारांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात अनेक खासदार पॉझिटिव्ह निघाले. पण नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह निघाले आहेत. लोकसभेतील १७ आणि राज्यसभेतील ८ अशा एकूण २५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
दुसऱ्यांदा कोरोना तरी तब्येत ठणठणीत
दरम्यान प्रतापराव चिखलीकर यांना दुसऱ्यांदा जरी कोरोना झाला असला तरी देखील त्यांनी आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले आहे. माझ्या तब्येतीबाबत कुणीही काळजी करू नये असेही त्यांनी सांगितले आहे.
मुंबईतही पुन्हा कोरोना रिटर्न
मुंबईमध्ये देखील पुन्हा चार जणांना कोरोना झाल्याचे समोर आले असून, चारही जण महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेत काम करीत आहेत. त्यापैकी २ डॉक्टर असून, १ परिचारिका आहे आणि अन्य १ जण आरोग्य व्यवस्थेत काम करणारे आहेत. चारही जणांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यावर उपचार केले जात असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
नांदेडमध्ये या नेत्यांना कोरोना
नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत असून, आतापर्यंत अशोक चव्हाण, मोहन हंबर्डे, माधवराव जवळगावकर, अमरनाथ राजूरकर हे आमदार पॉझिटिव्ह आले होते. तर खासदार चिखलीकर यांना दोन वेळा कोरोना झाला आहे.
Join Our WhatsApp Community