दिशा सालियन मृत्यू प्रकरणी वक्तव्य केल्यामुळे मालवणी पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात दिंडोशी सत्र न्यायालयाने राणे पिता पुत्र यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. १६ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान नितेश राणेंनी न्यायालयाच्या या निर्णयावर न्यायालयाचे आभार मानले आहे.
( हेही वाचा : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रखडली! कारण… )
अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
दिशा सालियन हिने आत्महत्या केलेली नसून तिचा खून झाला असल्याचे वक्तव्य नारायण राणे यांनी केले होते. राणे यांचे वक्तव्य नितेश राणे यांनी समाजमाध्यमावर व्हायरल केले होते. या वक्तव्यामुळे आमची बदनामी होत असल्याचे सांगत दिशा सालियन हिच्या आईने महिला आयोगाकडे दाद मागितली होती. तसेच मालवणी पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. दोन आठवड्यापूर्वी या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात मालवणी पोलिसांनी राणे पिता पुत्रांना समन्स बजावून चौकशीला पोलीस ठाण्यात बोलावून ९ तास त्यांची चौकशी करून जबाब नोंदवून घेण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्यात राणे पिता पुत्रांनी दिंडोशीच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
न्यायालयाचे आभार मानले
या जामीन अर्जावर आज (बुधवारी) न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने नारायण राणे आणि नितेश राणे यांना १६ हजाराच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे नितेश राणे यांनी न्यायालयाचे आभार मानले असून दिशा सालियन हिला न्याय मिळेपर्यंत आम्ही लढत राहू असे नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले.
Join Our WhatsApp Community