राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यामुळे राज्य सरकार आता लॉकडाऊन लावण्याच्या विचारात आहे. पण यामुळे आता लोक नाराज असून राज्य सरकारमधील मंत्र्यांनी ही या लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. यावरुनच भाजप खासदार नारायण राणे यांनी आपल्या शैलीत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि मुलगा दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे उद्धव ठाकरे, स्वतःच ती जबाबदारी पार पाडू शकले नाहीत. त्यामुळे आता राज्यातही कोरोना वाढत चालला आहे, अशा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
धमक्या द्यायला काय राज्य विकत घेतलं आहे का?
देशात कोणत्याही राज्यापेक्षा कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. मग या सरकारने त्याला रोखण्यासाठी काय केलं? आता जनतेने आणि स्वतःच्या पक्षातील नेत्यांनी विरोध केल्याने सरकार लॉकडाऊन करायला घाबरले आहे. नागरिकांना शिस्त पाळा नाहीतर लॉकडाऊन करावा लागेल, अशा धमक्या देण्याचा अधिकार यांना कोणा दिला, अशा धमक्या द्यायला यांनी काय राज्य विकत घेतलं आहे का? असा प्रश्न नारायण राणे यांनी विचारला आहे. लॉकडाऊन आता महाराष्ट्राला परवडणार नाही. राज्यात बेकारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सगळे उद्योग ठप्प झाले आहेत, पण त्याची या सरकारला अजिबात काळजी नाही. त्यामुळे हे सरकार राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी, कशी काय बसवणार, असा प्रश्न नारायण राणे यांनी विचारला आहे.
(हेही वाचाः मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार : लॉकडाऊन की मिनी लॉकडाऊन?)
कुंपणच शेत खात आहे
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा तर बोजवारा उडाला आहे. या सरकराच्या मंत्र्यांना कमवून देणे हेच राज्यातील अधिकारी वर्गाचे सध्या काम झाले आहे. सचिन वाझे १०० कोटी वसूल करुन गृहमंत्री अनिल देशमुख यांना देत होता. त्यामुळे इथे कुंपणच शेत खात आहे. कोणतंही काम पैशांशिवाय होत नाही. कोरोनाला रोखण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत, आरोग्य व्यवस्थेसाठी पैसे नाहीत. हा एकप्रकारे भ्रष्टाचार चाललेला आहे.
आपलं दुकान कसे चालेल? हे बघत आहेत
राज्याच्या गृहमंत्र्यांवर वसुलीचे आदेश दिल्याचे आरोप लावण्यात आले. आणि हे आरोप कोणी विरोधी पक्षाने नाही तर मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी लावले, ही फार गंभीर बाब आहे. राज्य सरकार चुकीच्या मार्गाने पोलिसांना घेऊन चालले आहे. सराकरमधील प्रत्येक जण आपलं दुकान कसं चालेल याकडेच लक्ष देत आहे. शिवसेना तर विचारू नका. सचिन वाझेची अशाप्रकारचे कृत्य करायची हिंमत होते कशी? यामागे कोणाचा हात आहे याची चौकशी होण्याची गरज आहे, असे नारायण राणे म्हणाले.
ही तर संकुचित वृत्ती
स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजना सोहळ्यात अनेक दिग्गज नेत्यांना वगळण्यात आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्या स्मारकासाठी खूप प्रयत्न केले. पण त्यांनाही या सोहळ्यात आमंत्रित केले गेले नाही. हे राजकारण अत्यंत चुकीचे आहे. विरोधी पक्षनेते पद हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांइतकच महत्त्वाचं पद आहे. त्यामुळे त्यांना या सोहळ्याचे आमंत्रण द्यायला हवेच होते. इतकेच नाही तर शिवसेनेतील मोठे नेते एकनाथ शिंदे यांचे नावसुद्धा निमंत्रण पत्रिकेत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे ही नाईलाजाने द्यावी लागतात. राज ठाकरे हे ठाकरे असूनसुद्धा त्यांना या सोहळ्याचे आमंत्रण दिले गेले नाही. राजसाहेब हे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या समोरच राहतात पण तरीही त्यांना बोलावले गेले नाही. ही खूप संकुचित वृत्ती आहे, असे नारायण राणे टीका करताना म्हणाले.
(हेही वाचाः लॉकडाऊन की कठोर निर्बंध, अधिकारी-मंत्र्यांमध्ये मतभेद! काय करणार मुख्यमंत्री?)
मुख्यमंत्र्यांना जय महाराष्ट्र म्हणावं
लॉकडाऊनमुळे रोजगार जाण्याची भीती. तरुण मुलांच्या नोक-या गेल्या तर काय करावं. धमक्या कोणाला देतात. राज्य आर्थिक संकटात आहे. आणि अशावेळी राज्याला लॉकडाऊनच्या गर्तेत ढकलणं हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे हे सरकार राज्याला सावरण्यात अपयशी आहे. असा व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला पोषक नाही. त्यामुळे या सरकारमधील इतर पक्षांनीही या व्यक्तीला जय महाराष्ट्र बोलावं. असे आवाहनही नारायण राणे यांनी सरकारमधील पक्षांना केले आहे.
Join Our WhatsApp Community