उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? ‘त्या’ रात्री काय घडले? राणेंनी केला धक्कादायक दावा

मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होण्याच्या आदल्या रात्री काय घडले होते, याची झोप उडवणारी माहिती राणेंनी दिली आहे.

110

राणे आणि शिवसेना यांच्यातील सामना हा काही महाराष्ट्रासाठी नवा नाही. आपल्या आक्रमक शैलीत संपूर्ण राणे कुटुंबीय कायमंच शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल करत असतात.

आता पुन्हा एकदा नारायण राणे यांनी प्रहार मधून उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे अचानक मुख्यमंत्री कसे झाले? हा प्रश्न गेली पावणे दोन वर्ष महाराष्ट्रातील तमाम जनतेला पडला आहे. पण नारायण राणे यांनी ‘हार आणि प्रहार’ या सदरातून याबाबतचा धक्कादायक खुलासा केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, याचा निर्णय होण्याच्या आदल्या रात्री काय घडले होते, याची झोप उडवणारी माहिती राणेंनी दिली आहे.

(हेही वाचाः अमृता फडणवीस विचारतात, ‘देशमुख, परमबीर सिंग हनिमूनला गेलेत का?’)

काय घडले आदल्या रात्री?

मला शरद पवारांनी मुख्यमंत्री केले, असे उद्धव ठाकरे सांगतात. पण ते नेमके मुख्यमंत्री कसे झाले ते आम्हाला माहीत आहे, अशा शब्दांत राणेंनी थेट निशाणा साधला आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्याच्या आदल्या रात्री संजय राऊत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना घेऊन पवारांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे किंवा इतर कोणी शिवसैनिक नव्हता. ‘साहेब आम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे होते, पण काही कारणामुळे ते शक्य नाही. त्यामुळे आता मलाच मुख्यमंत्री करा, अशी विनंती करायला आलो आहे’ , असे या भेटीदरम्यान उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना सांगितले असल्याचा गौप्यस्फोट राणेंनी प्रहारमधून केला आहे.

शिवसेना झाली मांजर, शेळी

उद्धव ठाकरेंच्या या विनंतीला संजय राऊत यांनीही दुजोरा दिला. त्यावेळी वाह! हे उत्तमच झाले! मी उद्याच्या बैठकीत हे जाहीर करतो, असे शरद पवार त्यांना म्हणाले होते. त्याप्रमाणे दुस-या दिवशी शरद पवारांनी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव जाहीर केल्याचा खुलासा प्रहारमधून करण्यात आला आहे. त्यामुळे आता आपण मांजरीप्रमाणे डोळे मिटून दूध पिणे सोडा. शिवसेना आता वाघ राहिली नाही, तिची मांजर, शेळी झाली आहे, असा थेट हल्ला शिवसेनेवर प्रहारमधून करण्यात आला आहे.

(हेही वाचाः माझ्या आग्रहाने उद्धव ठाकरे बनले मुख्यमंत्री! फडणवीसांच्या आरोपाचा पवारांनी केला खुलासा)

बाळासाहेबांना दिलेल्या शब्दाचं काय?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिलेले वचन आपण पूर्ण केले, असे उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात म्हणाले. पण त्या निव्वळ थापा असल्याचे प्रहारमधून म्हटले आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन हा शब्द तुम्ही साहेबांना दिलात आणि स्वतःच मुख्यमंत्री झालात, असा खळबळजनक आरोपही राणेंनी प्रहारमधून केला आहे. यापुढे तर शक्य नाहीच, पण भविष्यात पुन्हा कधी संधी मिळालीच तर हे ठाकरे सोडून कोणालाही मुख्यमंत्री करू शकत नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, अशी जहरी टीकाही उद्धव ठाकरे यांच्यावर राणेंनी केली आहे.

जीभ संयमात ठेवा नाहीतर…

भाजपा देशभर आहे. तुम्ही फक्त महाराष्ट्रात आणि तेही 56. राज्यात भाजपा 106 बहुमतासाठीचा आकडा 145 त्यामुळे तुम्ही केवळ आयत्या बिळावरचे नागोबा आहात, असा झणझणीत आरोप राणेंनी केला आहे. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांची बदनामी कराल, तर तुम्ही जे पेरता तेच उगवेल, हे लक्षात ठेवा आणि त्यावेळी काय होईल, याची कल्पना करा. जीभ संयमात ठेवा, जीभेचा सैरावैरा वापर करुन नका, असा थेट इशाराही प्रहारमधून शिवसेनेला देण्यात आला आहे.

(हेही वाचाः फडणवीस झाले ‘पत्रवीर’… मुख्यमंत्र्यांना लिहिली इतकी पत्रे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.