केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील स्मृतीस्थळाला भेट देत वंदन केले. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवतीर्थावरील स्मृती स्थळाला प्रथमच नारायण राणे यांनी भेट दिली असली, तरी साहेबांना प्रिय असणारी चाफ्याची फुले आणायला मात्र ते विसरले. राणे या भेटीदरम्यान बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला पिवळ्या सोनचाफ्याच्या फुलांचा हार अर्पण करतील, असे वाटले होते. परंतु राणे यांनी केवळ गुलाबाची फुले अर्पण केली. त्यामुळे ८ वर्षांनंतर प्रथमच बाळासाहेबांच्या स्मृतीला वंदन करणाऱ्या राणेंकडून न वाहिली गेलेली चाफ्याची फुले खूप काही सांगून गेली आहेत.
…आणि राणेंनी विना अडथळा घेतले दर्शन!
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईसह कोकणातील जन आशीर्वाद यात्रेला गुरुवारपासून मुंबईतून सुरुवात झाली. या जन आशीर्वाद यात्रेमध्ये राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन वंदन केले. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला वंदन करण्यापासून शिवसैनिक त्यांचा मार्ग रोखतील, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु प्रत्यक्षात राणे यांच्या मार्गात कुठेही अडथळा आला नाही आणि त्यांना आठ वर्षांनंतर प्रथमच या स्मृतीस्थळाला भेट देऊन वंदन करता आले.
(हेही वाचा : गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्यानंतर एमपीएससी आयोगाला आली जाग!)
नारायण राणे कायम बाळासाहेबांना द्यायचे सोनचाफा!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पिवळ्या सोनचाफ्याची फुले प्रिय होती. त्यामुळे शिवसैनिक कोणत्याही पदावर निवड झाल्यानंतर किंवा निवडून आल्यानंतर बाळासाहेबांची भेट घेऊन आशीर्वाद घ्यायचे. बाळासाहेबांच्या प्रत्येक भेटीचा सुगंध हा चाफ्याच्या फुलाप्रमाणे पुढे कायम दरवळला जायचा. राणे हेही प्रत्येक निवडीनंतर बाळासाहेबांची भेट घेताना चाफ्याच्या फुलांचा हार आवर्जून घेऊन जायचे. बाळासाहेबांना चाफ्याची फुले प्रिय असल्याने शिवसेनेचा वर्धापन दिन असो वा शिवाजी पार्कमधील दसरा मेळावा किंवा अन्य जाहीर सभा असो. प्रत्येकवेळी चाफ्याच्या फुलांचा हार हा बाळासाहेबांना घातला जायचा. त्यामुळे बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीस्थळावर २३ जानेवारीला जयंतीच्या दिवशी आणि १७ नोव्हेंबरच्या स्मृतीदिनी चाफ्याच्या फुलांची आरास करत सजावट केली जाते.
राणेंना विसर पडला की…
नारायण राणे हे शिवसेनेचे आणि बाळासाहेबांचे कडवे शिवसैनिक होते आणि बाळासाहेबांची प्रत्येक आवडनिवड ही राणे यांना माहीत आहे. बाळासाहेबांना चाफ्याची फुले आवडतात, याची कल्पनाही राणेंना असल्याने स्मृतीस्थळावर वंदन करायला येताना साहेबांना प्रिय असणारी चाफ्याची फुले ते वाहतील, चाफ्यांच्या फुलांचा हार अर्पण करतील, अशी अपेक्षा होती. परंतु राणेंना बाळासाहेबांच्या स्मृतीला वंदन करायला येताना ही फुले अर्पण करायचा विसर पडला, की जाणीवपूर्वक ते विसरले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राणेंच्या भेटीवर काक पक्ष्यांची दृष्टी
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर नारायण राणे आपल्या इतर नेत्यांसह वंदन करत असताना, त्याचवेळी दोन काक (कावळे) पक्ष्यांनी तिथे हजेरी लावली. राणे हे बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करत असतानाच या दोन्ही काक पक्ष्यांनी आवाज करण्यास सुरुवात केली. हिंदू धर्मात पितर ही कावळ्याच्या रुपात पाहिली जातात. त्यामुळे हे दोन्ही कावळे कुणाच्या रुपात तिथे प्रकटले आणि राणे यांना आशीर्वाद द्यायला आले होते का, अशी चर्चा तिथे उपस्थितांमध्ये रंगली होती.
Join Our WhatsApp Community