नारायण राणे आज जो आहे ते बाळासाहेबांमुळेच; राणेंनी जागवल्या आठवणी

82

कोकणातून मुंबईला आलेल्या एका मुलाला शिवसैनिक, शाखाप्रमुख, नगरसेवक ते राज्याच्या मुख्यमंत्री केले ते बाळासाहेबांनीच, असे म्हणत बाळासाहेबांमुळे आतापर्यंत केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहचलो आहे, असे केंद्रीयमंत्री नारायण राणे म्हणाले. विधीमंडळातील तैलचित्र अनावरण प्रसंगीही नारायण राणेंनी बाळासाहेबांसोबतच्या आपल्या आठवणी जागवल्या.

बाळासाहेब असते तर आज महाराष्ट्राचा राजकीय इतिहास वेगळा असता

मी २००५ साली शिवसेना पक्ष सोडून गेलो, अर्थात जाताना बाळासाहेबांना सांगून गेलो होतो. मात्र, तरीही दुसऱ्या दिवशी मला बाळासाहेबांनी फोन केला. नारायण उठला का, असे विचारले, मी होय सर म्हटले. त्यानंतर, ते म्हणाले, चल परत येतो का?… बाळासाहेबांच्या त्या प्रश्नावर मी काहीच उत्तर देऊ शकलो नाही. मी गप्प होतो, मग बाळासाहेबांनी ओके म्हणत फोन ठेऊन दिला, अशी आठवण नारायण राणेंनी सांगितली. बाळासाहेंबाच्या मनाचा मोठेपणा, दिलदारपणा, मराठी बाणा हाच आम्हा शिवसैनिकांना प्रेरणा द्यायचा. त्यामुळेच, त्यांच्या एका हाकेला ओ देत शिवसैनिक एकत्र यायचा, आजच्या शिवसेनेत तसा आवाज राहिला नाही, असेही राणेंनी म्हटले, बाळासाहेब असते तर आज महाराष्ट्राचा राजकीय इतिहास वेगळा असला असता, कोकणातून मुंबईला आलेला मी साधा एक शाखाप्रमुख ते महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री बनलो. आत्ता, मी भाषणाला येण्यापूर्वी माझ्या नावापूर्वी एक शब्द उच्चारला केंद्रीयमंत्री, त्याचे श्रेयही केवळ बाळासाहेबांनाच आहे, असे म्हणत नारायण राणेंनी बाळासाहेबांमुळे मला अपेक्षापेक्षा जास्त मिळाल्याचे सांगितले. ज्या बाळासाहेबांनी मला घडवले त्यांचे ऋण मी या जन्मी तरी फेडू शकत नाही, अशा शब्दात नारायण राणेंनी भावना व्यक्त केल्या.

(हेही वाचा बाळासाहेबांनी ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण हा विचार कार्यकर्त्यांमध्ये रुजवला – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.