उद्धव ठाकरेंची विधाने असंविधानिक नाहीत का? राणेंचा सवाल… कोणती आहेत ‘ती’ विधाने?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी रात्री महाड दंडाधिकारी कार्यालयाने जामीन दिल्यानंतर त्यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या काही विधानांचा दाखला देत, त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच सेनाभवनबद्दल बोलताना वापरलेले शब्द असंविधानिक नव्हते का, असा सवाल केला आहे.

नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना सवाल

पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिकरित्या केलेल्या काही विधानांचा उल्लेख केला. सेनाभवनबद्दल कोणी बोलेल तर त्याचे थोबाड फोडा, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीडीडी चाळीतील कार्यक्रमावेळी केले होते. हा गुन्हा नाही, याला कायद्याचे कलम लागू होत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल बोलताना त्यांनी हा योगी आहे की ढोंगी? याला चप्पलेने मारले पाहिजे, असे विधान केले होते. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला चप्पलेने मारण्याची भाषा करणे हे चुकीचे नाही का? विधानसभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी अमित शहा आणि त्यांच्यात झालेल्या चर्चेबाबत सांगताना निर्लज्जपणाने हा शब्द वापरला होता. हा शब्द असंविधानिक नाही का, असे सवाल नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारले आहेत.

(हेही वाचाः शिवसेनेच्या आंदोलनामुळे राज्याला झाले ‘हे’ फायदे… मनसेने दिली यादी)

टीका चालूच राहील

महाड आणि मुंबई उच्च न्यायालयात माझ्या बाजूने निकाल लागला आहे. त्यामुळे देशात कायद्याचं राज्य आहे, हे दिसून आले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 17 सप्टेंबर रोजी होणार आहे, त्यामुळे तोपर्यंत मी या प्रकरणावर काहीही बोलणार नाही, असे नारायण राणे म्हणाले. तसेच जन आशीर्वाद यात्रा ही दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर 27 तारखेपासून सिंधुदुर्गातून पुन्हा सुरू करण्यात येईल, त्यात खंड पडणार नाही असेही राणेंनी स्पष्ट केले. तसेच या यात्रेतही चांगल्या शब्दांत टीका चालूच राहील, असेही त्यांनी सांगितले आहे.

मला कोणी काही करू शकत नाही

माझा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली असे बोलले जात आहे. चिपळूणला निषेध करण्यासाठी केवळ 17 माणसं आली होती, मी स्वतः मोजली. आवाज बाहेर येत नव्हता तरी ते आवाज काढत होते. मुंबईत मी, नितेश आणि निलेश आम्ही तिघेही घरात नसताना आमच्या घरावर मोर्चा काढण्यात आला. तुम्हाला घरं नाहीत, मुलंबाळं नाहीत, तुम्ही कोणीही माझं काही करू शकत नाहीत. तुमच्या कुठल्याच कृतीला मी घाबरत नाही. शिवसेना मोठी करण्यामध्ये माझा मोठा वाटा आहे. आज जे बोलत होते ते तेव्हा कुठे होते काय माहीत?, असेही नारायण राणे यांनी म्हटले.

(हेही वाचाः भाजपला याची मोठी किंमत मोजावी लागेल… राणे-भाजपविरुद्ध शिवसेनेचा जंगी ‘सामना’)

संजय राऊतांवर साधला निशाणा

संजय राऊत हे ,संपादक पदाच्या लायकीचे नाहीत. केवळ मुख्यमंत्र्यांना खूश करण्यासाठी संजय राऊत अग्रलेख लिहीत असतात. त्यांना मी 17 सप्टेंबर नंतर नक्कीच उत्तर देईन, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here