राणे मंत्रिमंडळातील थोड्याच दिवसांचे ‘मेहमान’! शिवसेनेचा पुन्हा हल्लाबोल

महाराष्ट्राच्या अस्मितेची इतकी नाचक्की महाराष्ट्राच्या दुष्मनांनीही कधी केली नव्हती. राणे हे ‘नॉर्मल’ मनुष्य नसल्यानेच त्यांनी महाराष्ट्राला कमी लेखले. भाजपने आता तरी शहाणे व्हावे!, असे शिवसेनेने म्हटले.

117

राणे यांनी स्वतःला महान समजणे बंद केले तर त्यांच्या आयुष्यातील बऱयाच समस्या कोणत्याही औषधांशिवाय बऱ्या होतील व त्यांचा संसर्ग होण्यापासून भाजपही वाचेल. मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ते महान किंवा असामान्य झाले असतील तर त्यांच्या डोक्यातली हवा मोदीच काढतील हे पक्के. पंतप्रधान मोदी हेच त्यांच्या मंत्रिमंडळात सबकुछ आहेत. मंत्री येतात व जातात. मोदी हे स्वतःला फकीर समजतात व राणे ‘महान’ हा फरक समजून घेतला तर राणे हे केंद्रीय मंत्रिमंडळातले थोड्याच दिवसांचे ‘मेहमान’ आहेत, याविषयी फडणवीसांच्या मनातही शंका नसावी, अशा शब्दांत शिवसेनेने दैनिक सामना मधून पुन्हा हल्लाबोल केला.

राणे यांना अटक होणे व त्यानंतर रस्त्यावर हंगामा होणे, कार्यकर्त्यांशी संघर्ष होणे, कार्यालयांवर हल्ला करणे हे आजपर्यंत कधीच झाले नव्हते. त्यास सर्वस्वी राणे व त्यांची तळी उचलून धरणारे भाजपमधील नतद्रष्ट जबाबदार आहेत. शिवसेना-भाजपमध्ये आतापर्यंत वादाचे अनेक विषय झाले, पण एकमेकांवर चाल करून जाणे असे प्रकार घडले नव्हते, अशा शब्दांत शिवसेनेने दैनिक सामना मधून पुन्हा हल्लाबोल केला, असेही शिवसेनेने म्हटले.

(हेही वाचा : आता भाजप फ्रंटफूटवर : रश्मी ठाकरेंच्या विरोधात तक्रार दाखल!)

घाणेरडी भाषा हीच त्यांची संस्कृती

राणे, प्रसाद लाड हे मूळ भाजपवाले नसलेले ‘बाटगे भाजपनिष्ठेची जोरात बांग देऊ लागल्यावर ते घडले हे समजून घेतले पाहिजे. राणे व लाड यांच्यासारखे फुटकळ लोक कधीपासून हिंदुत्ववादी झाले? भाडोत्री लोकांच्या खांद्यावर बंदुका ठेवून कोणी शिवसेनेवर हल्ले करू पाहत असतील तर त्यांनी आपल्या गोवऱ्या आताच सोनापुरात रचून याव्यात. शिवसेनेचे हृदय वाघाचे आहे. शिवसेना अशा लढाया स्वबळावरच लढत आली आहे. त्यांना राणे, लाडसारखे भाडोत्री लोक लागत नाहीत. राणे व त्यांची मुले मुख्यमंत्र्यांपासून इतर सर्व ज्येष्ठांचा उल्लेख एकेरीत व घाणेरड्या भाषेत करतात, हीच त्यांची संस्कृती. माणसाने आपली लायकी दाखवायची ठरवली की, हे असे व्हायचेच. घरात व दारात भरपूर गांजाची शेती पिकवायची व त्याच गांजाचे सेवन करून कुणावरही कसेही बकायचे हा सध्या अनेक राजकारण्यांचा धंदा झाला आहे. ही गांजाची शेती कायद्यानेच बंद केली पाहिजे व त्याची सुरुवात केल्याबद्दल महाराष्ट्राची जनता ठाकरे सरकारला धन्यवाद देत आहे. फडणवीस व त्यांच्या पक्षाने गांजाच्या शेतात बागडायचे ठरवलेच असेल तर त्यांची नशा लवकरात लवकर उतरो हीच ‘अटल’चरणी प्रार्थना, दुसरे काय बोलायचे!, असेही शिवसेनेने म्हटले.

भाजपने आता तरी शहाणे व्हावे!

राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवले व अटक केली असे त्यांचे लोक बोलत आहेत. कायद्याला, पोलिसांना सहकार्य केले असते तर ही वेळ आली नसती. राणे यांना जेवणावरून उठवणे वाईटच; पण सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना जेवणावरून, भरसंसारातून कायमचे कोणी उठवले याचा नव्याने तपास ‘ठाकरे’ सरकारने करायला हवा. कायद्याचे राज्य मोडण्याचा प्रयत्न करणे हे गांजा मारून पडण्याइतके सोपे नाही. हा महाराष्ट्र आहे, तरीही ‘वर आमचे सरकार आहे! महाराष्ट्र केंद्राशी काय संघर्ष करणार?’ अशी मस्तवाल व महाराष्ट्रविरोधी भाषा राणे नावाचे केंद्रीय मंत्री वापरतात. महाराष्ट्राच्या अस्मितेची इतकी नाचक्की महाराष्ट्राच्या दुष्मनांनीही कधी केली नव्हती. राणे हे ‘नॉर्मल’ मनुष्य नसल्यानेच त्यांनी महाराष्ट्राला कमी लेखले. भाजपने आता तरी शहाणे व्हावे!, असेही शिवसेनेने म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.