नारायण तातू राणे… महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि फायरब्रँड नेते. नारायण राणे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळणार ही बातमी सर्वात आधी हिंदुस्थान पोस्टने फेब्रुवारी महिन्यातच ब्रेक केली होती. आता याच बातमीवर शिक्कामोर्तब झाले असून, नारायण राणे यांचा आता मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असून, ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र नारायण राणे यांना मंत्रीपद देऊन आता भाजपने शिवसेनेची डोकेदुखी वाढवली असून, शिवसेनेविरोधात राणे अधिकच आक्रमक होतील, असे बोलले जात आहे.
शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी ‘नारायणास्त्र’
शिवसेनेतून राजकारणाला सुरुवात केलेले नारायण राणे हे नंतर मात्र शिवसेनेचे कट्टर शत्रू झाले. 2005 साली शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शिवसेना नेहमीच राणेंच्या रडारवर राहिली आहे. राणेंनी शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. आधी काँग्रेस आणि आता भाजप याच नारायणास्त्राचा शिवसेनेविरोधात पुरेपुर वापर करुन घेत असून, आता राणेंना थेट केंद्रात मंत्रीपद देत राणेंची ताकद भाजपने वाढवली आहे. त्यामुळे आता राणे येत्या काळात शिवसेनेसाठी अडचणी वाढवतील हे मात्र नक्की.
(हेही वाचाः हे आहेत मोदी सरकारचे संभाव्य 24 मंत्री! महाराष्ट्रातून कोणाला मिळणार संधी?)
मराठा आरक्षणाचा अभ्यास
राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले असून, भाजप या मुद्यावरुन ठाकरे सरकारवर टीका करत आहे. आघाडी सरकारच्या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने नारायण राणे अध्यक्ष असलेल्या, राणे समितीने अहवाल देखील केला होता. त्याचमुळे राणेंचा मराठा आरक्षणावर दांडगा अभ्यास आहे. याचाच फायदा घेत भविष्यात राणे महाविकास आघाडीला शह देऊ शकतात.
भाजपला कोकणात अच्छे दिन
3 एप्रिल 2018 मध्ये नारायण राणे यांची भाजपच्या तिकीटावर राज्यसभेवर निवड झाली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर राणेंची एकहाती सत्ता आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती या राणेंच्या ताब्यात आहेत. त्यामुळे ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप नावाला होती, तेथे आज भाजपचे कमळ राणेंमुळे खुलले आहे. त्याचमुळे आता राणेंच्या मंत्रीपदामुळे जिल्ह्यात भाजपला अधिक बळ मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ-मालवण आणि सावंतवाडी या दोन मतदारसंघांत शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे भविष्यात या दोन्ही मतदारसंघांत राणे आपली ताकद अधिक वाढवतील, असे काही जाणकार सांगत आहेत.
(हेही वाचाः मुंडेंच्या लेकीचा मोदींना विसर?)
राणेंचा राजकीय इतिहास
शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा राणेंचा राजकीय प्रवास राहिला असून, राणे हे राज्यातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. चेंबुरमध्ये शाखाप्रमुख असलेले राणे 1985 साली मुंबई महापालिकेच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 1990 साली कणकवली-मालवण मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. 1995 मध्ये युतीची सत्ता आल्यावर त्यांच्याकडे दुग्ध व्यवसाय विकास, पशु संवर्धन, मत्स्य व्यवसाय, खार जमिनी, विशेष सहाय्य व पुनर्वसन, उद्योग या खात्यांचा कारभार सोपवण्यात आला. 1997 साली त्यांच्याकडे महसूल खाते सोपवण्यात आले. मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर 1998 ते 99 या काळात त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. 2005 साली शिवसेना सोडून ते काँग्रेसमध्ये गेले. 2009 मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना अवजड उद्योग खाते मिळाले. त्यानंतर राणे 2018 मध्ये भाजपच्या गोटात गेले आणि राज्यसभेचे खासदार झाले. आता ते थेट कॅबिनेट मंत्री होत आहेत.
(हेही वाचाः उत्तर भारतीयांची ‘कृपा’ भाजपवर होणार का?)
Join Our WhatsApp Community