राणेंची जन आर्शीवाद यात्रा अन् सेनेला ‘असा’ बसला दणका!

१५ वर्षे शिवसैनिक राहिलेल्या आशा बुचके यांनी भाजपात प्रवेश केला असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यश चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत आशा बुचकेंचा पक्षप्रवेश झाला.

99

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आर्शीवाद दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली असून, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत राणेंचे आज जोरदार शक्ती प्रदर्शन पहायला मिळाले. एकीकडे राणेंचे जोरदार शक्ती प्रदर्शन होत असताना भाजपने शिवसेनेला जोरदार दणका दिला आहे. १५ वर्षे शिवसैनिक राहिलेल्या आशा बुचके यांनी भाजपात प्रवेश केला असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यश चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत आशा बुचकेंचा पक्षप्रवेश झाला. भाजपचा पुणे जिल्ह्यात शिवसेनेला हा जोरदार झटका मानला जात आहे. आशा बुचके यांनी १५ वर्षे शिवसेनेचे काम केले. महिलांचे मोठे नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्यात पराभवानंतर शिवसेनेने जुन्नर तालुक्यात मोठा राजकीय बदल केला होता. शिवसेनेकडून बुचके यांची हकालपट्टी करण्यात आली होती, दरम्यान आशा बुचके यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

(हेही वाचा : अखेर नारायण राणेंची ‘ती’ इच्छा पूर्ण झाली!)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

शिवसेनेच्या नेत्या व पुणे जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे आपल्याला मोकळा श्वास घेतल्यासारखे वाटते, असे आशा बुचके यांनी प्रवेश केल्यानंतर सांगितले होते. त्याचा धागा पकडून देवेंद्र फडणवीस यांनी टिप्पणी केली. राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपाला पक्ष विस्ताराची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. युतीमध्ये असताना भाजपाला पक्ष विस्ताराला संधी मिळत नव्हती. आता तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यातील घटक पक्षांचा श्वास कोंडू लागला आहे. आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात मोकळ्या श्वासाने पक्षाचे काम करू आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर भाजपाला सत्तेवर आणू. आशाताईंसारख्या कार्यकर्त्या सत्तारूढ पक्षातून भाजपामध्ये येतात ही स्वबळावरील विजयाची नांदी आहे आशा बुचके यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. त्यांचा भाजपामध्ये सन्मान केला जाईल. भाजपामध्ये आतला – बाहेरचा, जुना – नवा असा भेद नाही. एकदा पक्षाचा झेंडा हाती घेतला की पक्ष त्या नेत्याची काळजी करतो. आशाताई बुचके यांना शिवसेनेत न्याय मिळाला नाही. पण भाजपामध्ये त्यांचा सन्मान राखला जाईल आणि त्यांना न्याय मिळेल. जेव्हा विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळी त्यांना आमदार झालेले पाहू असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.