माझी कर्मभूमी मुंबई आहे, पण १९९० साली माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला कोकणात पाठवले. त्यावेळी मी जिल्हा पहिला. इथे फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्याला पाणी मिळत नव्हते, रस्ते नव्हते, वीज नव्हती, शिक्षण, वैद्यकीय व्यवस्था नव्हती, मुले शिकली तर नोकरीसाठी मुंबईला जायचे. मुंबईवर अवलंबून असलेला हा जिल्हा मी विकसित केला. लोकांच्या संपर्कात कोण आहे? आजारी पडल्यावर कोण मदत करतो? हे येथील जनतेला चांगले ठाऊक आहे. उद्धवजी, हे सगळे साहेबांच्या प्रेरणेतून केले, अशा संदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या भाषणातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला.
चिपी विमानतळाचे उद्घाटन हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते.
जिल्ह्याचा विकास फक्त राणेमुळेच, दुसरे नाव येऊच शकत नाही!
हा जिल्हा विकसित करण्याचे मी ठरवेल, त्यासाठी टाटा इन्स्टिट्यूटकडे गेलो. त्यांनी हा जिल्हा पर्यटनातून विकसित होऊ शकतो, असे सांगितले. त्यानंतर राज्यात युतीची सत्ता आली आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना विनंती केली आणि पहिल्यांदा हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो, सहकारी गोपीनाथ मुंडे यांच्या सहकार्याने ११० कोटींच्या मदतीने सर्व व्यवस्था उभी केली. आज जो विकास दिसतो याला नारायण राणे कारणीभूत आहे, दुसरे कुणाचे नाव येऊच शकत नाही, असे नारायण राणे म्हणाले.
श्रेय बाळासाहेबांचे!
माझ्याकडून जिल्ह्याच्या विकासाचे काम झाले, त्याचे श्रेय बाळासाहेबांचे आहे. मी श्रेय घेतच नाही. जसा तेंडुलकर खेळतो, पण श्रेय बॅटला देतो, तसे या विकासाचे श्रेय मी घेतच नाही.
(हेही वाचा : क्रूझवरून सोडून दिलेला ‘तो’ मेव्हणा मोहित भारती यांचा!)
आजही विकास थांबला आहे!
१५ ऑगस्ट २००९ साली मी आणि सुरेश प्रभू विमानतळाच्या भूमिपूजनाला आलो, तेव्हा समोर विरोध करत होते. जमीन द्यायला विरोध करत होते, महामार्गाला विरोध करत होते, विकासाच्या कामाला अडवत होते. तुम्ही समजा तशी परिस्थिती इथे नव्हती. आज परिस्थिती बदलली आहे, तुम्ही आलात बरे वाटले, माझ्या वेळी धरणाचे काम जे झाले आज १ टक्काही पुढे जात नाही, विमानतळाजवळ रस्ते झाले नाही, असेही राणे म्हणाले.
उद्धवजी, तुम्हाला खोटी माहिती दिली जातेय!
बाळासाहेबांकडे खोटे चालायचे नाही, ते कधी खोटे बोलले नाहीत. उद्धवजी, तुम्हाला जी माहिती पुरवली जाते, ती खोटी आहे, ती तपासून घ्या, त्यासाठी गुप्त माणसे नेमा, असेही राणे म्हणाले.
मानसन्मान जनता देईल!
मानसन्मान काय जनता देईलच. मी विमानातून येत असताना विनायक राऊत पेढ्याचा पुडा घेऊ आले आणि त्यांनी पेढा खा, म्हणाले. मी डायबेटिज आहे म्हणून थोडासा खाल्ला. पण तोंड चांगले ठेवा, त्याकडे पाहून चांगले वाटले पाहिजे मंचावर आल्यावर विनायक राऊत यांनी कार्यक्रमाचे संचालन करतायेत, हा काय कुणाच्या घरचा कार्यक्रम आहे का? एमआयडीसीचे अधिकारी कुठेच दिसत नाही. प्रोटोकॉल वगैरे काही आहे का?, असेही राणे म्हणाले.
आदित्यवर काही बोलणार नाही!
आदित्य हा माझ्या दृष्टीने टॅक्स फ्री आहे. त्याच्यावर मी बोलणार नाही. त्याने काम करून दाखवावे, कर्तबगारी करून दाखवावी, मला अभिमान आहे. आदित्य ठाकरे यांनी टाटा कंपनीचा अहवाल अभ्यास करावा, किल्ल्याची डागडुजी करून दाखवावी, असेही राणे म्हणाले.
Join Our WhatsApp Community