ज्यांनी शिवसेनेसाठी त्याग केला ते शिवसेनेत कुठे आहेत? आता फक्त शिवसेनेत कलेक्टर उरलेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी अनिल परब यांच्यावर केली. अनिल परब कुणासाठी कलेक्शन करतो हे सांगायला नको, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली.
जो पैसे देईल, त्याला शिवसेनेत मंत्रीपद
सचिन वाझे यांच्या व्हायरल झालेल्या पत्रानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत बाळासाहेब ठाकरे आणि मुलींची शपथ घेत आपल्यावर झालेले आरोप खोटे असल्याचे म्हटले होते. यावरुन राणेंनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. याला शपथ घ्यायला बाळासाहेबांनी सांगितले होते का? जोरात कामाला लाग असे म्हणत शिवसेनेमध्ये पैशाशिवाय काहीच मिळत नाही. जो पैसे देईल त्याला वाटेल ते मंत्रीपद शिवसेनेत दिले जाते. सचिन वाझेला मुंबईतून फक्त 100 कोटी जमा करायला सांगितले. हे आदेश फक्त अनिल देशमुखांचे नाहीत. राज्यातील सर्व मोठ्या नेत्यांचे हे आदेश आहेत. मग तुम्ही हे जमा केलेले पैसे लसीसाठी का नाही वापरत? ते पैसे कुठे जातात? कोणाकडे जातात? सांगा ना कुणीतरी, असे देखील राणे म्हणाले. आज राज्यात माणसे मारण्याची सुपारी पोलिसच घेत आहेत. सचिन वाझेला सुपारी दिली कोणी हे मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवे, असे म्हणत राज्यात सध्या हफ्तेबाजी सुरू असल्याचे म्हटले आहे. कुठलीही बदली पैशाशिवाय होत नाही, असे देखील राणे म्हणाले.
(हेही वाचाः पर्यावरण मंत्र्यांचं ‘नागरिकशास्त्र’ कच्चं…? आदित्य ठाकरेंकडून घडली मोठी ‘चूक’!)
ही तुमची ‘जबाबदारी’ नाही का?
राज्यात डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय कमी आहेत. याबद्दल राज्य सरकार केंद्राला टार्गेट करत आहे. महाराष्ट्रात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढतोय. पण उपाययोजना करायला महाराष्ट्र कमी पडत आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णांची आणि मृत्यूंची संख्या वाढतेय त्याचं गांभीर्य राज्य सरकारला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे केंद्राकडे बोट दाखवत आहेत. याशिवाय त्यांनी बाकी जी कारणं सांगितली आहेत, डॉक्टर-नर्सेस नाहीत. पण ही कोणाची जबाबदारी आहे? माझे कुटुंब माझी जबाबदारी, महाराष्ट्र जर तुमचं कुटुंब असेल, तर या सगळ्या गोष्टी उपलब्ध करणं, रुग्णांवर योग्यरित्या उपचार करणं, त्यांना ठणठणीत करणं ही तुमची जबाबदारी नाही का? पिंजऱ्यात का जाऊन बसताय? कोरोना परिस्थिती हाताळायला हे सरकार कमी पडलं आहे. केंद्राकडे का बोट दाखवता, अशा आपल्या खास शैलीत राणे यांनी टोला लगावला.
ते राज्य काय सांभाळणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच मुद्द्यावरुन भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. हे स्वतः कधी मातोश्रीच्या बाहेर पडत नाहीत मग, कोरोना होईल कसा? मुख्यमंत्री स्वत:च्या कुटुंबाला सांभाळू शकत नाही, ते महाराष्ट्राला काय सांभाळणार? अशा बोचऱ्या शब्दात राणेंनी टीका केली.
Join Our WhatsApp Community