पहिल्याच दिवशी राणेंनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा

मंत्रालयाचा कारभार स्वीकारताच राणेंनी आपल्या स्टाईलमध्ये अधिकाऱ्यांची शाळा घेतली.

77

नारायण राणे… राज्यासह देशात सध्या या नावाची जोरदार चर्चा आहे. आक्रमक नेतृत्व असलेले राणे आता केंद्रीय मंत्री झाले. प्रशासनावर पकड असलेला राज्यातील नेता अशी राणेंची ओळख आहे. मात्र आता राणे आपली हीच ओळख दिल्लीत निर्माण करण्यासाठी देखील सज्ज झाले आहेत. प्रशासनावावर पकड असलेली राणेंची ही झलक आज दिल्लीत देखील पहायला मिळाली. त्याचे कारण म्हणजे  केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार स्वीकारताच राणेंनी आपल्या स्टाईलमध्ये अधिकाऱ्यांची शाळा घेतली.

अशी घेतली राणेंनी अधिकाऱ्यांची शाळा

राणेंनी आपल्या मंत्रीपदाचा चार्ज गुरुवारी स्वीकारला. मात्र राणे जेव्हा मंत्रालयात चार्ज घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारले. नारायण राणेंनी अधिकाऱ्यांना मंत्रालयाचे जीडीपीमध्ये किती योगदान आहे? असा प्रश्न विचारताच अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

(हेही वाचाः नारायण राणेंना लघु, मध्यम उद्योग मंत्रालय! )

असा आहे राणेंचा राजकीय अनुभव

शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा राणेंचा राजकीय प्रवास राहिला असून, राणे हे राज्यातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. चेंबुरमध्ये शाखाप्रमुख असलेले राणे 1985 साली मुंबई महापालिकेच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 1990 साली कणकवली-मालवण मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. 1995 मध्ये युतीची सत्ता आल्यावर त्यांच्याकडे दुग्ध व्यवसाय विकास, पशु संवर्धन, मत्स्य व्यवसाय, खार जमिनी, विशेष सहाय्य व पुनर्वसन, उद्योग या खात्यांचा कारभार सोपवण्यात आला. 1997 साली त्यांच्याकडे महसूल खाते सोपवण्यात आले. मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर 1998 ते 99 या काळात त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. 2005 साली शिवसेना सोडून ते काँग्रेसमध्ये गेले. 2009 मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना अवजड उद्योग खाते मिळाले. त्यानंतर राणे 2018 मध्ये भाजपच्या गोटात गेले आणि राज्यसभेचे खासदार झाले. आता त्यांच्याकडे
लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार सोपण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.