नारायण राणे यांना अखेर अटक!

194

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी न्यायलयाने फेटाळला. त्यामुळे आता नारायण राणेंच्या अटकेची दाट शक्यता निर्माण झाली होती. अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली.

रत्नागिरी पोलिस अधीक्षक स्वतः राणे ज्या संगमेश्वर येथे थांबले होते, तिथे पोहचले आणि त्यांनी अटकेची कारवाई सुरु केली. त्यानंतर त्यांना नाशिक पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. त्याआधी पोलिस अधीक्षकांनी त्यांना सर्व गुन्ह्याची माहिती दिली, तसेच भारत सरकारलाही कळवण्यात आले आहे. सर्व राजशिष्टाचार पार पाडण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाचा तातडीची सुनावणी घेण्यास नकार 

रत्नागिरी न्यायालयाने अटकपूर्व जमीन फेटाळल्यानंतर नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, त्यावेळी उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे नारायण राणे यांना अटकेपासून वाचण्याचे सर्व पर्याय संपले. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. सीआरपीएफचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक यांनी राणे यांना सर्व माहिती देण्यात आली. कोणत्या कलमांखाली ही अटक होत आहे, त्याची माहिती दिली. त्यावेळी सर्व कागदोपत्री कारवाई पोलिसांनी पूर्ण केली.

रत्नागिरी पोलिस अधीक्षकांकडे अटक वॉरंट नाही, त्यांच्याकडे अटक वॉरंट विचारला मात्र ते म्हणतात की, आमच्यावर दबाव आहे, ५ मिनिटांत अटक करण्यास सांगितल्याचे पोलिस अधीक्षक म्हणत आहेत. हे गुंडांचे राज्य आहे का?, वॉरंट न दाखवता अटक कशी करता? ते केंद्रीय मंत्री आहेत. त्यांचा सन्मान राखला पाहिजे, नारायण राणे यांचा रक्तदाब आणि मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे डॉक्टर त्यांना तपासात आहेत.
– प्रमोद जठार, भाजप नेते

जन आशीर्वाद यात्रा प्रवीण दरेकर पूर्ण करणार

नारायण राणे यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोकणाकडे रवाना केले आहे. जेणेकरुन जर नारायण राणे यांना अटक झाल्यास त्यांची जनआशीर्वाद यात्रा ही प्रवीण दरेकर पुढे चालवतील. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रत्नागिरी न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचं वृत्त समोर येत आहे.

(हेही वाचा : केंद्रीय मंत्री असलेल्या राणेंना अटक होऊ शकते का? काय म्हणतो कायदा?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.