मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंना स्थान?

लवकरच मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार असून यात नारायण राणेंना संधी मिळू शकते.

87

नारायण तातू राणे… महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे फायरब्रॅंड नेते… नारायण राणे या नावाचा आजही राज्याच्या राजकारणात तितकाच दबदबा आहे. मात्र आता वर्षभरापूर्वीच भाजपवासी झालेले नारायण राणे हे मंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लवकरच मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार असून, या नव्याने होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात राणेंकडे मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे कळते. त्यासाठी भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे दिल्लीला रवाना झाले आहेत.

भाजपचे ‘लक्ष्य’, शिवसेना पक्ष

मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरून शिवसेना-भाजपमध्ये बिनसले आणि शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बराच काळ उलटला आहे. पंतप्रधान मोदी यांनाही आता मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची इच्छा झाली आहे. महाराष्ट्रातून सध्या नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर हे कॅबिनेट, तर रावसाहेब दानवे, संजय धोत्रे आणि रामदास आठवले हे राज्यमंत्री असे सहा मंत्री आहेत. सध्या असलेल्या सहा मंत्र्यांपैकी कुणाचाही पत्ता कट होण्याची शक्यता नाही. गडकरी-गोयल-जावडेकर-दानवे-आठवले यांचे स्थान निश्चित आहे. संजय धोत्रे यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही, त्यामुळे त्यांचा जागी बदल होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर नारायण राणेंच्या नावावर प्राधान्याने विचार होऊ शकतो. तसेच शिवनसेनेला डिवचण्यासाठी एवढेच नाही तर भाजपला शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात भाजप पक्ष वाढवायचा असून, त्यासाठी भाजप राणेंना केंद्रात मंत्री बनवेल, अशी शक्यता आहे.

(हेही वाचा: उद्रेक झाला तर सरकार जबाबदार! उदयनराजे यांचा इशारा)

आधी सुरक्षा, आता ‘मंत्रिपद’ 

यापूर्वी ठाकरे सरकारने राणेंची राज्यातील सुरक्षा कपात करण्यापूर्वीच, केंद्राने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. त्यांना केंद्राकडून “वाय” दर्जाची सुरक्षा देण्यात आली असून, यात दोन अधिकाऱ्यांसह ११ सुरक्षा रक्षकांचे पथक तैनात केले आहे. त्यामुळे शिवसेनेला टार्गेट करणाऱ्या राणेंचा भाजपमधील दबदबा वाढल्याचे हल्ली पहायला मिळत आहे.

राणेंची राजकीय ‘कारकिर्द’

शिवसेनेचे शाखाप्रमुख झालेले राणे नंतर नगरसेवक झाले. त्यानंतर बेस्टचे अध्यक्ष असा राणेंचा राजकीय दबदबा वाढतच होता. 1991 साली भुजबळांनी सेना सोडली आणि विधीमंडळातल्या विरोधपक्ष नेतेपदाची संधी आमदार राणेंकडे चालून आली. त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या ऐतिहासिक सत्तांतरात शिवसेना-भाजप युती सरकारात राणे महसूल मंत्री झाले. युती सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मनोहर जोशींना गैरव्यवहारांच्या आरोपांचा सामना करावा लागला. बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींचा राजीनामा घेतला आणि नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र, 2005 मध्ये नारायण राणेंनी काही आमदारांसोबत शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसवासी झाले. राणेंना काँग्रेसमध्ये महसूल मंत्रिपद मिळाले. त्यानंतर 2009 मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना उद्योग खाते मिळाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकी अगोदर नारायण राणे भाजपवासी झाले आणि त्यांना भाजपने राज्यसभेवर देखील पाठवले.

(हेही वाचा: आधीच पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष, आता कोकणाला नुकसान भरपाई देखील मिळेना!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.