राणेंनी आता मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र! काय केली मागणी?

148

नारायण राणे…केंद्रीय मंत्री आणि राज्यातले एक महत्वाचा नाव…राणे आणि शिवसेना हा वाद काही नवा नाही. नुकताच या वादाचा एक अंक देखील समोर आला. मात्र आता केंद्रीय मंत्री राणेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रुग्णवाहिकेची गरज असल्याचे म्हटले आहे. राणे यांनी जिल्ह्यातील 38 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका पुरवण्याची मागणी केली आहे.

काय आहे राणेंचे पत्र?

जिल्हा परिषद अध्यक्षा, सिंधुदुर्ग यांच्याकडून प्राप्त झालेल्या निवेदनानुसार, जिल्हा परिषद सिंधुदुर्गने 13 वा वित्त आयोगांतर्गत प्राप्त अखर्चित निधी तसेच 14 वा वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीच्या व्याजाची रक्कम रुपये 89 लाख 91 हजार 951 रुपये इतकी रक्कम शासन आदेशान्वये राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, पुणे यांचे खात्यामध्ये वर्ग केलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवेची गरज पाहता व सद्यस्थितीत कोविड-19 चा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील 38 प्राथमिक केंद्राना रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका निर्लेखित झालेल्या असल्याने आरोग्य सुविधा व सेवा बळकटीकरणासाठी अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचेकडे उपरोक्त रक्कमेतून सहा रुग्णवाहिका खरेदी करण्यास मंजुरी मिळणेची विनंती करण्यात आलेली होती.

(हेही वाचा : अमरिंदर सिंग नक्की आहेत कोण? नेटकरीही झाले संभ्रमित)

प्रस्ताव अद्यापी प्रलंबित

जिल्हा परिषद रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्हा परिषदांनी सदर योजनांमधील निधीतून रुग्णवाहिका खरेदी केलेल्या आहेत. मात्र जिल्हा परिषद, सिंधुदुर्गचा प्रस्ताव उपरोक्त कार्यालयाकडे अद्यापी प्रलंबित आहे. या संदर्भात जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी आपल्या विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावावर योग्य ती कार्यवाही करावी ही नम्र विनंती असे राणेंनी पत्रात म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.