शिंदे गटातील आमदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी लोकसभेमध्ये दिशा सालियान मृत्यूप्रकरणी सनसनाटी आरोप केल्यानंतर, हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दरम्यान, शेवाळेंच्या आरोपांनंतर नितेश राणेही आदित्य ठाकरेंविरोधात आक्रमक झाले आहेत. तसेच, याप्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
नितेश राणे म्हणाले की, सगळ्यांनी विचार करायला हवा महाराष्ट्रात एवढे राजकारणी आहेत. जेव्हा सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियानचा विषय येतो तेव्हा आदित्य ठाकरेंचाच उल्लेख का होतो. इतरांचा का होत नाही. म्हणजेच कुठे ना कुठे दाल मे कुछ काला है, असा संशय नितेश राणे यांनी व्यक्त केला.
( हेही वाचा: ठाकरे गटाला आणखी एक धक्का; नाशिकमधील आमदारांसह, नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश )
AU म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे
राणे म्हणाले की, आतापर्यंत मी, नारायण राणे, अमित साटम, अतुल भातखळकर आम्ही सगळेजण बोलत होते. सुशांतसिंह राजपूतचे फॅन्सही याच्या चौकशीची मागणी करत आहेत. आता बुधवारी ज्यांनी हा विषय लोकसभेत उपस्थित केला, ते राहुल शेवाले मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये होते. यांच्या विश्वासातील होते. वर्षानुवर्षे स्थायी समितीतचे अध्यक्ष होते. बुधवारी आदित्य ठाकरे म्हणाले की, मी त्यांना काडीची किंमत देत नाही, पण हेच शेवाळे स्थायी समितीचे अध्यक्ष, खासदार असताना ते तुमच्या घराकडे पेट्या पोहोचवायचे तेव्हा त्यांना किती किंमत होती, तेही तुम्ही सांगा. त्यांच्याच किचन कॅबिनेटमधील खासदार सांगतो की, जे 44 काॅल झाले त्यातील एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे आहेत. तर त्याची चौकशी झाली पाहिजे. आता माझे स्पष्ट म्हणणे आहे की, आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, होऊन जाऊ दे एकदाच काय ते, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.